पालकमंत्री दिपक केसरकर यांची जे जे रुग्णालयाला भेट

@maharashtraciy

मुंबई: मुंबईचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी जे जे रुग्णालयाला बुधवारी भेट दिली. ही भेट रुग्णालयातील विविध विभागाच्या आधुनिकीकरणासाठी (modernization of departments of J K Hospital) घेण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. यात जे जे रुग्णालयातील रुग्णांना जेवण पुरवठा करणाऱ्या किचनपासून ते निवासी डॉक्टरांच्या वस्तीगृहापर्यंत तसेच विविध विभागातील आधुनिकीकरणासाठीचे आदेश केसरकर यांनी दिले.

पालकमंत्री केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या रुग्णालय भेटीवेळी मुंबईचे जिल्हाधिकारी तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर उपस्थित होते. यावेळी ग्रांट वैद्यकीय महाविद्यालय तसेच जे जे समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी महाविद्यालय आणि रुग्णालय सद्यस्थितीचा तसेच कामकाजाबाबतचा आढावा दिला. तर वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय सुरासे यांच्याकडून रुग्णालयातील समस्या समजून घेतल्या.

यावेळी रुग्णालयातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन रुग्णालयातील विविध विभागांचे आधुनिकीकरण करण्याचे आदेश दिपक केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार कार्डिओलॉजी विभागामध्ये अँजिओप्लास्टीसाठी (angioplasty) उपयोगात येणारी नविन कॅथलॅब मशिन आणि टु.डी. इको मशिन (2D Eco machine) खरेदीची प्रक्रिया तात्काळ राबवण्याचे आदेश देण्यात आले.

तसेच सर्जरी विभागातील रेडिओ प्रिफक्वेन्सी ऑब्लेशन मशिनसह रुग्णोपयोगी साहित्य खरेदी करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले. कॅथलॅब, मेन सर्जरी ओटी यास त्यांनी सर्व अधिकारी आणि डॉक्टरांसमवेत भेट दिली. तसेच रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या किचनलासुद्धा केसरकर यांनी भेट दिली.

हे किचन मॉड्युलर करण्यासंदर्भातील सुचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्याना दिल्या. मॉड्युलर किचनमुळे दाखल रुग्णांना दररोज मिळणारे जेवण अधिक सोयीस्कररित्या मिळेल, असे सांगण्यात आले. तसेच ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (Grant Medical College) सर्व पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांच्या नुतनीकरणासंबंधीतही सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना निर्देशित करण्यात आले.

तसेच विद्यार्थ्यांच्या खोल्या, कॅन्टीन, वसतीगृह परिसर अद्ययावत करण्याबाबतच्या सुचनाही मंत्री केसरकर यांनी दिल्या. रुग्णालयात अहोरात्र रुग्णसेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या वस्तीगृहाचे नुतनीकरण तातडीने होण्याच्या संदर्भातील आदेश पालकमंत्री केसरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना दिले. या सर्व कामांसाठी लागणारे खर्च हे जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात येतील, असे केसरकर म्हणाले.

गरज पडल्यास खर्चासाठी मंत्रीमंडळाची मान्यताही घेऊ, असे त्यांनी आश्वासन दिले. यावेळी हृदयरोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. कल्याण मुंढे, सर्जरी विभाग पथक प्रमुख डॉ. गिरीष बक्षी, यांनी त्यांच्या विभागातील सोयीसुविधाबाबतचे सादरीकरण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here