@maharashtracity
आठ – दहा दिवसांत खड्डे बुजवण्याचे आदेश
महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना झापले
खड्डे बुजविण्याच्या कामात हलगर्जीपणा
मुंबई: पूर्व उपनगरांतील रस्त्यावर पडलेल्या खड्डयांबाबत तीव्र संताप व्यक्ती करीत महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी संबंधित पालिका अधिकाऱ्यांना चांगलेच झापले आहे. तसेच, येत्या आठ – दहा दिवसांत रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत. (Mayor instructed administration to repair potholes)
पूर्व उपनगरातील कुर्ला, जरीमरी येथील संपूर्ण रस्त्यांवरील खड्डयांची उपायुक्त पायाभूत सुविधा व प्रमुख अभियंता रस्ते यांच्यामार्फत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे संबंधित पालिका अधिकारी, कंत्राटदार यांचे धाबे दणाणले आहेत.
मुंबईतील खड्डे समस्येवरून विरोधी पक्ष, भाजप गटनेते, नगरसेवक यांनी सत्ताधारी शिवसेनेवर व सेना नेत्यांवर शरसंधान साधले आहे. याची गंभीर दखल घेऊन महापौर किशोरी पेडणेकर यांनी, कुर्ला येथील जरीमरी मार्ग तसेच चेंबूर येथील सुभाष नगर मार्गावरील खड्ड्यांची सोमवारी स्वतः पाहणी केली.
यावेळी, महापौरांनी रस्त्यावरील खड्डे पाहून तीव्र संताप व्यक्त केला. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यांवर खड्डे पडणे समजू शकते. पण त्यानंतर पावसाने उघडीप दिल्यानंतर खड्डे बुजविणे हे आपल्या सर्वांचे प्रथम कर्तव्य आहे. गणपती विसर्जनानंतरही रस्त्यांची अशी स्थिती राहत असेल तर ती गंभीर बाब आहे.
खड्डे बुजविण्यासाठी स्वतंत्र रस्ते अभियंता नियुक्त केल्यानंतरही त्यांना अतिरिक्त पदभार इतर विभागाचा देण्यात येत असेल तर ते चुकीचे आहे. संबंधित रस्ते अभियंत्यांना रस्त्याचे काम सोडून इतर कोणत्या विभागाचा चार्ज देण्यात आलेला आहे, याची स्वतंत्र चौकशी करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
या संपूर्ण रस्त्यांवरील खड्डांची उपायुक्त पायाभूत सुविधा तसेच प्रमुख अभियंता रस्ते यांच्यामार्फत चौकशी करून अहवाल देण्याचे आदेशही महापौरांनी यावेळी दिले.
तसेच, रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी सहाय्यक अभियंता रस्ते यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे, असे आदेश महापौरांनी यावेळी दिले.
त्याचप्रमाणे मेट्रोच्या कामामुळे ज्या ठिकाणी खड्डे पडलेले असेल त्या ठिकाणी मेट्रोच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तात्काळ त्या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेशही महापौरांनी यावेळी दिले.
शिवसेना – भाजप यांच्यात खड्ड्यांवरून कलगीतुरा
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी कुर्ला येथील जरीमरी आणि चेंबूर येथील सुभाषनगर भागातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केली. या खड्ड्यांच्या समस्येवरून सत्ताधारी शिवसेना व पहारेकरी भाजप यांच्यात आरोप, प्रत्यारोप होऊन कलगीतुरा पहायला मिळत आहे.
महापौरांनी खड्ड्यांच्या समस्येवरून संबंधित पालिका अधिकारी, कंत्राटदार यांना चांगलेच झापले आहे. त्यावर भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde), भालचंद्र शिरसाट (Bhalchandra Shirsat) यांनी, सत्ताधाऱ्यांनी रस्ते, खड्डे यांवर तब्बल २१ हजार कोटी रुपये खर्चल्यानंतर सत्ताधारी, महापौरांना आता खड्डे समस्या कळायला लागल्या आहेत, ही समाधानाची बाब आहे, असा टोला महापौरांना लगावला आहे.
तर महापौर किशोरी पेडणेकर यांनी, भाजपाने आधी आपल्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे पाहावेत, असा टोला भाजपला लगावला आहे.