@maharashtracity
मुंबई: राज्य सरकारी रुग्णालयांतील परिचारिकांच्या संघटनेकडून कंत्राटीकरणाविरोधात संप पुकारला आहे. परिचारिकांच्या संपाला मध्यवर्ती मार्ड संघटनेने पाठींबा दिला आहे. राज्यात सुरु असलेल्या परिचारिका संपाला मार्डचा पूर्ण पाठींबा असून सरकारने त्यांच्या मागण्यांचा संवदेनशीलपणे विचार करावा, असे मार्ड संघटनेने पाठींबा पत्रात म्हटले आहे.
यावर बोलताना महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना राज्य उपाध्यक्ष हेमा गजभिये यांनी सांगितले की, संपाची आता व्याप्ती वाढत आहे. विविध स्तरावरील संघटनांचा पाठींबा मिळत असून मध्यवर्ती मार्ड संघटनेने पाठींबा दिला असल्याचे सांगण्यात आले. कोविड लढ्यात डॉक्टरांसोबत परिचारिकांचा मोलाचा वाटा आहे. शासन दरबारी त्यांच्या मागण्यांचा संवदेनशीलपणे विचार करुन त्वरीत तोडगा काढावा असे पाठींबा पत्रात म्हटले आहे.
लातूर येथे रविवारी मुंबईतील आंदोलनकर्त्यां प्रतिनिधी परिचारिकांनी बैठक आयोजित केली होती. यात संपाचा मागोवा घेत कोणत्याही स्थितीत मागे न हटण्याबाबत ठरले असल्याचे हेमा गजभिये म्हणाल्या. दरम्यान, शनिवारपर्यंत काही शस्त्रक्रियांचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले. तर काही ठिकाणी डॉक्टरांना कामावर त्वरीत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच गंभीर आणि अत्यावश्यक शस्त्रक्रियांचे वेळापत्रक नियोजन सुरु असल्याचे राज्य सरकारच्या विविध रुग्णालयांमधून समजत आहे.
दरम्यान, बेमुदत कामबंद आंदोलन सुरु राहणार असून मागण्यांवर प्रशासकीय यंत्रणेसोबत ठोस बोलणे होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले.