भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये पुन्हा भीषण आग ; आगीमागे संशय
@maharashtracity
मुंबई: भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये (Dream Mall, Bhandup) एका वर्षांपूर्वी म्हणजे २५ मार्च रोजी भीषण आग लागून ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज ४ मार्च रोजी पुन्हा एकदा याच मॉलमध्ये भीषण आग लागून मॉल जळाला.
मात्र, धक्कादायक बाब म्हणजे मागील वर्षीच्या आगीनंतरपासून बंद स्थितीत असलेल्या खंडर मॉलमध्ये भीषण आग लागलीच कशी ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
तर, भाजपच्या वार्ड क्रमांक ११२ मधील स्थानिक नगरसेविका साक्षी दळवी यांनी, मॉल वर्षभर बंद होता. मात्र, त्या मॉलमध्ये गर्दुल्ले घुसखोरी करून नशा करीत असत, अशी धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळे या आगीबाबत संशय निर्माण झाला आहे. कदाचित त्या गर्दुल्ल्यांमुळेच त्या मॉलला आग लागली नसावी ना ? अशी शंका उपस्थित झाली आहे.
प्राप्त महितीनुसार, भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये २५ मार्च २०२१ रोजी सनराईज रुग्णालयात (Sunrise Hospital) भीषण आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी ९ जणांचा आगीच्या धुरामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच, त्या रुग्णालयात दाखल २ कोविड रुग्णांचाही दुर्दैवी मृत्यू (death of covid patients) झाला होता. त्यानंतर या आगीची चौकशी लावण्यात आली होती. त्यावेळेपासून हा मॉल बंद स्थितीत होता.
आता एका वर्षानंतर पुन्हा एकदा शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास याच मॉलमध्ये अचानक आग लागली. ही आग हळूहळू भडकली व अग्निशमन दलाने ही आग स्तर -३ ची म्हणजे भीषण स्वरूपाची असल्याचे जाहीर केले. यावेळी मॉलसमोर आग बघण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम अग्निशमन दलाकडून (fire brigade) सुरू होते.
स्थानिक नगरसेविका साक्षी दळवी (Sakshi Dalvi) यांनी आगीची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी, अग्निशमन दलाकडून फायर इंजिन व वॉटर टँकर यांच्या मदतीने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अग्निशमन दल, पोलीस यांच्याकडून ही आग का व कशी लागली, याबाबत चौकशी सुरू आहे.