@maharashtracity
मुंबई: जगभरात जीवघेणा ठरलेल्या ‘कोरोना’ मुळे मुंबई महापालिकेच्या (BMC) इतिहासात प्रथमच सर्वपक्षीय नगरसेवकांची प्रत्यक्ष सभा भायखळा येथील राणी बागेत नव्याने उभारलेल्या प्रशस्त अशा शाहीर आण्णाभाऊ साठे सभागृहात काहिशा गदारोळात पार पडली.
या सभेला महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar), उप महापौर सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, विरोधी पक्षनेते रवी राजा, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, गटनेते राखी जाधव, आमदार व गटनेते रईस शेख, भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, चिटणीस संगीता शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
मात्र काही नगरसेवक पहिल्या प्रत्यक्ष सभेला गैरहजर राहिल्याचे समजते. त्यामुळे अर्धे सभागृह मोकळे होते.
राणीच्या बागेतील ही ऐतिहासिक अशी पहिली प्रत्यक्ष सभा होती. त्यामुळे या सभेला एक वेगळं महत्व होतं. एकतर कोरोनाने ना गरीब, ना श्रीमंत, ना मध्यमवर्गीय, ना स्त्री, ना पुरुष आणि ना तृतीयपंथी अशा कोणालाच सोडले नाही. अगदी लोकप्रतिनिधी यांनाही या कोरोनाचा मोठा फटका बसला.
मुंबई महापालिकेची शेवटची सभा पालिका मुख्यालयात या कोरोनामुळे १७ मार्च २०२० रोजी पार पडली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत पालिकेच्या सभा या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ऑनलाईनच (online) घेतल्या. पालिका कामकाजासाठी पालिकेची एकही प्रत्यक्ष सभा झालेली नव्हती. कोरोना नियमाचे काटेकोर पालन करून ही सर्वपक्षीय सभा घेण्यात आली.
आज पालिकेची पहिली प्रत्यक्ष सभा (offline meeting) कधी नव्हे ते राणी बागेतील जिवंत प्राणी, पक्षांचा किलबिलाट, गर्द हिरवळ झाडी, निसर्गमय वातावरण, शुद्ध हवा अशा वातावरणात पार पडली.
प्रशस्त सभागृह, भलं मोठं व्यासपीठ, फुल एसी सभागृह आणि जवळपास ७०० आसनव्यवस्था असलेले हे सभागृह असून महापौर, आयुक्त, चिटणीस यांच्यासाठीही भली मोठी जागा असलेले व्यासपीठ होतं.
सभेची वेळ सायंकाळी ४ वाजताची होती. मात्र प्रत्यक्ष सभा सायंकाळी ४.४७ वाजता ‘वंदे मातरम’ या राष्ट्रागाणाने सुरू झाली आणि २८ मिनिटांच्या कामकाजानंतर म्हणजे सायंकाळी ५.१५ वाजता ‘जनगणमन—‘ या राष्ट्रगीताने संपली.
मात्र शहर आणि पूर्व, पश्चिम उपनगराच्या शेवटच्या टोकापासून आलेल्या सर्वपक्षीय अनेक नगरसेवकांना राणी बागेत साठे सभागृह नेमके कुठे आहे, तेच माहीत नव्हते. त्यामुळे अनेक नगरसेवकांना शोधाशोध करावी लागली.
अनेक नगरसेवक अगोदरच म्हणजे वेळेपूर्वीच आले होते. तर अनेकजण उशिराने सभागृहात दाखल झाले. अगदी सत्ताधारी शिवसेना, विरोधी पक्ष व भाजप या पक्षाचे काही नगरसेवक तर सभा संपण्याच्या १५ मिनिटांपर्यंत वेळ अगोदर सभागृहात दाखल झाले होते.
तसेच, सभेला आलेल्या अनेक नगरसेवकांना आपली वाहने कुठे पार्क करावीत याबाबत नीटपणे माहिती नव्हती. काही गटनेते, विविध समिती अध्यक्ष यांनी त्यांची वाहने बाजूच्या महापौर बंगल्याच्या आवारात, तर कोणी रस्त्यालगत, तर कोणी शाहीर आण्णाभाऊ साठे सभागृहाच्या आवारात पार्क केली होती.
मात्र सभा संपल्यावर नगरसेवकांनी आपल्या वाहनांसाठी सभागृहासमोरील गेटवर गर्दी केली आणि त्यावेळी वाहतूक कोंडी झाल्याचे निदर्शनास आले.
मात्र पालिका सभागृहात महापौर आसन व्यवस्था व सर्व नगरसेवक आसने यांच्यात किमान १५ -२० फुटांचे अंतर होते. सभागृहात कोरोना नियमानुसार, आसनव्यवस्था होती. नगरसेवकांना आसनावर छोट्या प्लास्टिक ट्रे मध्ये पाण्याची बाटली व सॅनिटायझर बाटली उपलब्ध करण्यात आली होती.
मात्र जुन्या सभागृहाप्रमाणे आसनासमोर कामकाज करण्यासाठी कागदपत्रे, अजेंडा उपलब्ध करणे प्रशासनाला जागेच्या अडचणीमुळे शक्य झाले नव्हते.
मात्र भाजपने (BJP) आज दोन विषयांवरून सभागृहत सुरुवातीपासूनच गदारोळ घातल्याने नवीन सभागृह आणि त्यात कामकाज करण्याबाबतचा वेगळा असा अपेक्षित आनंद भाजप आणि इतर पक्षाच्या नगरसेवकांनाही अनुभवता आला नाही.