७ झोपड्यांची पडझड ; २०० झोपडीधारक स्थलांतरित झाल्याने बचावले

मुंबई: विलेपार्ले जुहू रोड, इंदिरा नगर येथील नाल्यालगतची जमीन रविवारी रात्रीच्या सुमारास खचल्याने ७ झोपड्यांची पडझड झाली. तर अंदाजे २०० झोपडीधारकांना तत्काळ नजीकच्या पालिका शाळेत व अन्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केल्याने त्यांचे प्राण वाचले. शिवाय कोणीही जखमी झालेले नाही.

वास्तविक, भाजपच्या स्थानिक माजी नगरसेविका सुनीता मेहता व त्यांचे पती राजेश मेहता आणि त्यांच्या टीमने दुपारी ज्यावेळी जमीन खचायला सुरुवात होऊन एका घराला तडा गेला त्याचवेळी झोपडीधारकांना सावध करून त्यांना महापालिकेच्या मदतीने सामानासह नजीकच्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. मात्र, अद्यापही धोका टळलेला नसल्याने नाल्यालगतच्या आणखीन २०० झोपडीधारकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे लागणार आहे. त्यासाठी स्थानिक आमदार व खासदार यांचे आणि महापालिका प्रशासन यांचे आवश्यक सहकार्य घेण्यात येईल, असे राजेश मेहता यांनी सांगितले.

ही घटना घडायला दुपारी एक वाजल्यापासूनच सुरुवात झाली होती. इंदिरा नगर १ व २ मध्ये सन १९७६ च्या अगोदरपासून काही नागरिकांनी अतिक्रमण करून एकामागोमाग एक अशा ४०० झोपड्या इंदिरानगर १ व २ याठिकाणी उभारल्या होत्या. काही कालावधीनंतर या झोपडीधारकांनी अतिक्रमण करून व कायदा धाब्यावर बसवून नाल्यालगत एक एक करून झोपड्या उभारल्या.

अनेक झोपडीधारकांनी नाल्यालगतच्या जागेवर एक अधिक एक, एक अधिक दोन, तीन मजल्यापर्यंतच्या झोपड्या बांधलेल्या आहेत. त्यांना त्या त्या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी धोक्याची जाणीव करून दिली होती. मात्र भावनेच्या भरात व गरज म्हणून अनेक झोपडीधारकांनी अतिक्रमण करून झोपड्यांची उंची वाढवली.

पण अनेक वर्षांपासून विलेपार्ले, इंदिरा नगर – २ आणि इंदिरा नगर -१ या ठिकाणी महत्वाच्या नाल्यालगत राहणाऱ्या ४०० झोपडीधारकांपैकी अनेकांनी बेकायदा बांधकामे केली होती. परिणामी रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास इंदिरानगर -१ येथे नाल्यालगतच्या एका घराला जमीन खचल्याने तडा गेला. त्यामुळे परिसरातील अनेक झोपडीधारकांना धडकी भरली. इंदिरा नगर झोपडपट्टी परिसरात या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

या घटनेची माहिती मिळताच, भाजपच्या माजी नगरसेविका सुजाता मेहता व त्यांचे पती राजेश मेहता यांनी, घटनास्थळी तात्काळ म्हणजे २ वाजेच्या सुमारास भेट देऊन पाहणी केली. तसेच, तेथील काही झोपडीधारकांना तात्काळ आवश्यक कागदपत्रासह सुरक्षित स्थळी म्हणजे योग्य व सुरक्षित ठिकाणी पालिकेच्या सन्यास आश्रम पालिका शाळेत तात्पुरता निवारा उपलब्ध करून दिला. त्यांच्या जेवणाची आणि पाण्याची सुविधाही करण्यात आल्याची माहिती सुनीता व राजेश मेहता यांनी यावेळी दिली.

मुंबई महापालिका यंत्रणा सोमवारी घटनास्थळी भेट देऊन सखोल पाहणी करणार आहे. त्यानंतर पालिका प्रशासन तज्ज्ञांच्या सहमतीने सदर ठिकाणच्या झोपडीधारकांच्या पात्रतेबाबत निर्णय घेणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here