@maharashtracity

मुंबई: मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे (traffic congestion) तीन टक्के घटस्फोट होतात, असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केले आहे. त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी, ‘हा जावई शोध’ अमृता यांनी कुठून लावला, असा सवाल उपस्थित केला आहे.

तसेच, उगाच मुंबईला बदनाम करण्याचे काम कोणी करू नये, असा इशाराही महापौरांनी दिला आहे.

अमृता फडणवीस यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेताना, ‘त्या जर एक सामान्य स्त्री म्हणून बोलत होत्या तर मग आम्ही त्यांना कुठल्या भूमिकेत बघायचे ? सामान्य स्त्री की माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून बघायचे? ‘ असा सवालही महापौरांनी उपस्थित केल्याने आता या वादाला आणखीन तोंड फुटले आहे.

महापौर एवढ्यावर थांबल्या नाहीत. ‘जे लोक ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रातच त्यांनी काम करावे. मात्र २०१९ ला जे राजकीय बदल झाले त्यावरून मला वाटत होते की, भाजपमधील पुरुषच हैराण होते. पण आता त्यांच्या घरच्या महिलाही हैराण झाल्या आहेत’, असे रोखठोक उत्तर महापौरांनी दिल्याने त्या आता पुन्हा एकदा भाजप (BJP) व अमृता फडणवीस यांच्या रडारवर आल्या आहेत.

कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत कॉंग्रेस स्वबळावरच लढणार आहे, असे काँग्रेसने (Congress) जाहीर केले आहे. त्यावर उत्तर देताना महापौर म्हणाल्या की, प्रत्येक पक्षाचा एक अजेंडा असतो. त्यावर त्याचे नेते काम करत असतात. आघाडीबाबतचा निर्णय सर्व पक्षांचे पक्षश्रेष्टी घेतील.

किर्तनकार बंड्यातात्या कराडकर (Banda Tatya Karadkar) यांनी राजकारण्यांची मुले दारू पितात म्हणून सरकारने दुकानांमध्ये दारू विक्रीला परवानगी दिली, असा आरोप केला होता. हा आरोप करताना त्यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे नाव घेतले होते.

त्यावर बोलताना महापौर म्हणाल्या की, ‘सर्वानी बोलताना भान ठेवावे. शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाटेल ती तुलना करू नये. त्यांनी काल सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यावर जे वक्तव्य केले ते चुकीचे आहे. ही वृत्ती महाराष्ट्राला अधोगतीकडे नेत आहे, असे महापौर म्हणाल्या.

‘त्या’ जवानाच्या मुलाला नोकरी

माटुंगा येथे मॉकड्रिल (mock drill) दरम्यान अपघातामध्ये जखमी झालेल्या सदाशिव कार्वे या अग्निशामक जवानाचा उपचार घेताना दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावर बोलताना महापौरांनी ‘ त्या’ जवानाच्या कुटूंबियांना न्याय मिळेल, असे आश्वासन दिले आहे.

मॉकड्रिल दरम्यान नेमके कोणते यंत्र वापरले गेले, हे कशामुळे झाले, याची चौकशी सुरू आहे. एकाला निलंबीतही केले आहे. मृत जवानाच्या कुटूंबियांना निश्चितच न्याय मिळेल. त्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत. निवडणूक आचारसंहिता लागो न लागो, त्यांच्या मुलाला नोकरी मिळेल व त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळेल, असे आश्वासन महापौरांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here