कोविडचे बळी ठरलेल्या सुरक्षा अधिकारी, कर्मचारी यांच्या वारसांना पालिकेत नोकऱ्या
सुरक्षा दलाचा ५४ वा वर्धापनदिन संपन्न
@maharashtracity
मुंबई: मुंबई महापालिका सुरक्षा दलातील अधिकारी, सुरक्षारक्षकांची (Security force of BMC) रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. पालिका सुरक्षादलाचे व भांडुप येथील प्रशिक्षण केंद्राचे लवकरच आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. कोविडचा मुकाबला करताना कोविड बाधा होऊन मृत्युमुखी (death due to covid) पडलेल्या सुरक्षा दलातील अधिकारी, जवान यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात येत असून त्यांच्या वारसांना पालिका सेवेत नोकऱ्याही देण्यात येणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी दिले आहे.
त्यामुळे पालिका सुरक्षा दलातील अधिकारी, सुरक्षारक्षक यांच्या बहुतांश समस्या मार्गी लागणार असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई महापालिका सुरक्षा दलाचा ५६ वा वर्धापनदिन व पारितोषिक वितरण समारंभ भांडुप संकुल येथील सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्रात महाशिवरात्री दिनी संपन्न झाला.
समन्वयाने संकटाला तोंड द्यावे
कोविड काळात (covid pandemic) पालिका सुरक्षादल, अग्निशमन दल आणि आपत्कालीन विभाग यांनी उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगत अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी कौतुक केले. त्यामुळे यापुढेही पालिका सुरक्षादल खाते, अग्निशमन दल आणि आपत्कालीन विभाग यांनी समन्वय साधून एकत्रितपणे कोणत्याही संकटाचा मुकाबला करावा, असे आवाहनही अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी यावेळी केले.
प्रशिक्षण केंद्राचे ५ कोटीत आधुनिकीकरण
भांडुप संकुल येथील सुरक्षादलाच्या प्रशिक्षण केंद्राचे ५ कोटी रुपये खर्चून लवकरच आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
अग्निशमन दल व सुरक्षादलामुळे जीवित हानी टळली – उपायुक्त प्रभात रहांगदळे
कोविड काळात पालिकेच्या कोविड सेंटरला एकदा आग लागलेली असताना अग्निशमन दल (fire brigade) व सुरक्षादलामुळे एकत्रित बचावकार्य केल्याने वित्तीय व मोठी जीवित हानी टळली, अशी माहिती प्रभात रहांगदळे (उपायुक्त) यांनी यावेळी दिली.
आधुनिकीकरण व रिक्त पदे भरणे आवश्यक – विलास सुर्वे
याप्रसंगी, सुरक्षादलातर्फे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देत उत्कृष्ट संचलन सादर करण्यात आले. त्यानंतर विलास सुर्वे, प्रमुख सुरक्षा अधिकारी (प्र.) यांनी सर्वप्रथम सुरक्षा दलाचा आढावा दिला. तसेच, सुरक्षा दलाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती देत सुरक्षादलातील रिक्त पदे भरण्याची व आधुनिकीकरण करण्याची विंनती केली.
यावेळी,सुरक्षा दलाचे शिस्तबद्ध संचलन व शस्त्र संचलन झाले. या अंतर्गत लाठ्या-काठ्या, सशस्त्र कवायती इत्यादींची लक्षवेधी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
तसेच, उपप्रमुख सुरक्षा अधिकारी दिनेश चव्हाण यांनी संचलन प्रमुख म्हणून उत्कृष्ट संचलन केले. त्यांचा अतिरिक्त आयुक्त काकाणी यांच्याहस्ते प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. उपप्रमुख सुरक्षा अधिकारी संदीप वालावलकर व सतीश दाभने सुरक्षा रक्षक यांनी सूत्रसंचालन केले तर विभागीय सुरक्षा अधिकारी सुशील बडेकर, सहाय्यक सुरक्षा अधिकारी सूरज शेडगे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
यावेळी, उत्कृष्ट संचलनाची ट्रॉफी समीर माने यांच्या प्लाटूनला अतिरिक्त आयुक्त काकाणी यांच्या हस्ते देण्यात आली. सहाय्यक सुरक्षा अधिकारी छगन काळे, पालिका उप जनसंपर्क अधिकारी गणेश पुराणिक, सुरक्षा दलाचे आजी व माजी अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.