@maharashtracity
मुंबई: राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमधील (Infrastructure projects) मेट्रोसारख्या महत्वकांक्षी प्रकल्पाला जपानच्या (Japan) जायका (JICA) संस्थेमार्फत अर्थसहाय्य केले जात आहे. त्याच धर्तीवर राज्यातील आरोग्य सुविधांना मदत करण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ. फुकाहोरी यासुक्ता यांच्याकडे केली.
गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ. यासुक्ता यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी टोपे यांनी मागणी केली. याप्रसंगी आरोग्य विभागाच्या सचिव केरेकट्टा उपस्थित होत्या.
यावेळी कर्करोग (Cancer) उपचारावरील सुविधांच्या उभारणीसाठी सहकार्यासाठी विशेष उल्लेख केला. कर्करोग उपचारासाठी रेडीएशन थेरपी (Radiation Therapy) उपचाराकरीता यंत्रणा उभारणीसाठी जपानकडून तंत्रज्ञान आणि अर्थसहाय्य उपलब्ध करून देतानाच जालना (Jalna) येथे कर्करोग उपचार रुग्णालय उभारणीकरीता सहकार्य करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
महाराष्ट्र (Maharashtra) आणि जपानचे नेहमीच सहकार्याचे संबंध राहीले आहेत. पर्यटन (Tourism) तसेच पायाभूत सुविधांच्या विकासकामांसाठी जपान सरकारच्या ‘जायका’ संस्थेमार्फत अर्थसहाय्य केले जात आहे. त्यामध्ये मुंबईतील मेट्रोसारख्या प्रकल्पांचा (Metro Project) समावेश आहे.
कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राचे महत्व लक्षात घेता राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या उभारणीसाठी ‘जायका’कडून अर्थसहाय्य करण्यासाठी सांगण्यात आले.
तसेच आरोग्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जपान मधील परिस्थिती, लसीकरणाची स्थिती, लॉकडाऊन, आरोग्य सुविधा याबाबत माहिती जाणून घेतली. महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या जपानी नागरिकांच्या लसीकरणासाठी आवश्यक ती मदत केली जाईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी जपानच्या वाणिज्यदूतांना दिली.
कामगार रुग्णालयासाठी विशेष मागणी
सध्या कामगार रुग्णालयांना मदतीची गरज आहे. ही रुग्णालये स्पेशालिटी स्वरूपात झाल्यास कामगार आरोग्य यंत्रणा मजबूत होऊ शकते. त्यामुळे राज्य कामगार आरोग्य विभागाच्या वरळी आणि मुलुंड येथील जागेवर सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल (Super Speciality Hospital) उभारणीसाठी देखील जायकाकडून आर्थिक सहाय्य मिळावे, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.