जे जे तील अवैध क्लिनिकल ट्रायल कार्यालय प्रकरण
दोन दिवसात समितीचा अहवाल सादर होण्याची शक्यता
Twitter: @maharashtracity
मुंबई: ईडीने टाकलेल्या छापेमारीत कोविड घोटाळ्याप्रकरणी जेजे रुग्णालयातील डॉ. हेमंत गुप्ता यांचे नाव पुढे आल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. जे जे रुग्णालयात तीन क्लीनिकल ट्रायलचे तीन रुममध्ये कार्यालय होते. हे तीनही रुम सील करण्यात आले आहेत. संबंधित प्रकरणाचा येत्या दोन दिवसात संपूर्ण अहवाल समोर येणार असल्याची माहिती जे जे रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान, राज्य सरकारच्या जे जे समुह रुग्णालयात क्लिनिकल ट्रायलचे कार्यालय अवैध सुरु होते. शिवाय यात दहाहून अधिक कर्मचारी कामाला होते. या कर्मचाऱ्यांचे पगार देखील होत असत. मात्र रुग्णालयीन प्रशासन व्यतिरिक्त बाहेरील व्यक्ती येऊन क्लिनिकल ट्रायलचे कार्यालय उघडणे, तसेच त्या व्यक्तीला ती उघडण्यासाठी अधिष्ठात्याने परवानगी देणे अशा बाबी घडल्या असल्याने एकंदरीत या प्रकरणाच्या चौकशीसाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. चौकशी अहवाल येत्या दोन दिवसात सर्वासमोर येईल, अशी माहिती जेजे रुग्णालयातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, क्लिनिकल ट्रायल प्रकरणसाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली. यातून जे जे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी तीन रुम सील करण्याचे आदेश दिले आहेत.
या तीन रुममध्ये क्लिनिकल ट्रायल संबंधित कार्यालय होते. मात्र या कार्यालय संबंधित काहीच पुरावे किंवा संबंध दाखवणारे कोणतेही कागदपत्र प्रशासनाच्या हाती नसल्याने संबंधित करार कसा झाला, किंवा जागेचे भाड्यासंबंधित काही लिखित पुरावे आहेत का अशा बाबींची तपासणी सुरु आहे. शिवाय अधिष्ठात्यांना शासनाचे जागा भाड्याने देण्याचे अधिकार नसताना कसे व्यवहार झाले, अशा गोष्टींची तपासणी सुरु आहे. शिवाय या ठिकाणी १४ कर्मचारी कामाला होते. मात्र यांना पगार कोण देत होते. त्याची यादी मिळाली नाही. म्हणजे रुग्णालयाबाहेरील व्यक्ती येऊन या ठिकाणी गुन्हेगारीचे काम करु शकतो, असे यातून निष्पन्न होत असल्याची शंका त्या अधिकाऱ्याने व्यक्त केली. या सर्वावर चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. त्यानुसार तपास सुरु आहे. यातून ट्रायल कोण कोण करत होते त्याची माहिती समोर येईल असे ही तो अधिकारी म्हणाला.
यावर बोलताना जे जे रुग्णालय समुहाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली असून त्याचा तपास सुरु आहे. संबंधित प्रकरणाचा चौकशी अहवाल दोन दिवसात सर्वांसमोर येणार असल्याचे डॉ. सापळे म्हणाल्या.