शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ वायरल करुन अजब दावा
कुपर रुग्णालय शवविच्छेदन विभागाकडून दावा फेटाळला
Twitter: @maharashtracity
मुंबई: नमस्कार मी रुपकुमार शाह, असे नाव सांगत सुशांतसिंह रजपूत यांची हत्या झाली असल्याचा दावा करणारा व्हिडीओ सोमवारी प्रसारित करण्यात आला. यात शाह नावाच्या व्यक्तिने शवविच्छेदन केले असल्याचे सांगत सुशांतसिंह याच्या मृतदेहावर त्याचा खून झाल्याचा खुणा होत्या असल्याचे म्हटले आहे.
मात्र, कुपर रुग्णालय अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी या व्हिडिओतील व्यक्ती कुपर रुग्णालयाचा कर्मचारी नसल्याचे सांगत फेटाळून लावला. या व्हीडिओमुळे कुपर रुग्णालयाची नाहक बदनामी होत असल्याचे डॉ. मोहिते म्हणाले.
सोमवारी हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. ही व्यक्ति त्याचे नाव रुपकुमार शाह असल्याचे सांगून शवविच्छेदनातील तत्कालीन स्थिती सांगत आहे. सुशांतसिंह रजपूतचा खून झाला असून त्याचं हातपाय तोडण्यात आले होते. त्यामुळे तो फाशी घेऊ शकत नाही. त्यामुळे ती आत्महत्या नसल्याचा दावा शाह व्हिडीओत केला आहे.
शाह पुढे म्हणाले की, पोस्ट मार्टम करताना व्हिडिओ शुटिंग करण्यास सांगितल्यावर दमदाटी करण्यात आली. शिवाय गळफासाच्या कोणत्याही खुणा सुशांतसिंहच्या गळ्यावर अजिबात नव्हत्या, असे शाह यांनी व्हिडिओत सांगितले आहे. त्याचा गळा कापून मारण्यात आला आहे असे फोटोतूनही सिद्ध होते.
दरम्यान, शाह यांची फेब्रुवारीत निवृत्ती येणारी होती. शिवाय उच्च पदावरील व्यक्तिंनी सांगितल्या प्रमाणे ऐकणे गरजेचे होते. मी एक गरीब माणूस असून निवृत्तीला आलेलो नोकर असल्याने माझ्या जीवाची काळजी मला होती. त्यामुळे मला तोंड दाबून बुक्क्यांचा मारा सहन करावा लागला. आता जे झाले ते झाले. मात्र आता सुशांतसिंह मला सतत समोर येऊन सतावत आहे. माझ्याकडे न्यायाची मागणी करत आहे. त्यामुळे आता मला जीवाची पर्वा नसून मी आता सांगत असलेले सत्य असून ज्याची हत्या झाली आहे त्या जीवाला न्याय मिळावा. मुख्यमंत्र्यांनी माझ्या जीवाची काळजी घ्यावी व न्याय करावा असे सांगत शाह यांनी हा व्हिडिओ संपवला आहे.
दरम्यान, या व्हिडिओतील व्यक्तीच्या सत्यतेसाठी कुपर रुग्णालयाच्या शव विच्छेदन विभाग प्रमुख डॉ. शैलेश मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता डॉ. मोहिते म्हणाले की, हा कर्मचारी पालिकेचा नसून हा कुपर पोस्ट मार्टम सेंटरच्या महाराष्ट्र शासनाअंतर्गत येणाऱ्या विभागाचा आहे. शिवाय पोलिसांच्या अखत्यारित हा भाग येतो. मात्र या व्हिडीओमुळे कुपर रुग्णालयाची बदनामी होत असल्याची खंत कुपर रुग्णालय अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी व्यक्त केली.