सखल भागात साचले पाणी
रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम
पावसाच्या तडाख्यात २३ झाडे/ फांद्यांची पडझड
पेडर रोड येथे दरड कोसळली
४ ठिकाणी घरांची पडझड

@maharashtracity

मुंबई: मुंबईत बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे हिंदमाता, किंग्जसर्कल, सायन, अंधेरी सब वे, चेंबूर, कमानी आदी सखल भागात काही प्रमाणात पाणी साचले. रेल्वे व रस्ते वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला.

तसेच, या पावसातच पेडर रोड येथे दरड कोसळली. मात्र, कोणीही जखमी झालेले नाही. चार ठिकाणी घरांच्या भागाची आणि शहर व उपनगरात २३ ठिकाणी झाडे/ फांद्या यांची पडझड झाली आहे. तर दोन ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.

मुंबईत बुधवारी रात्रीपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. गेल्या २४ तासांत कुलाबा वेधशाळेने २२७.८ मिमी व सांताक्रूझ वेधशाळेने १७५.५ मिमी इतक्या पावसाची नोंद केली आहे. तसेच, शुक्रवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या कालावधीत शहर भागात ४६.०० मिमी, पूर्व उपनगरात – ५५ मिमी तर पश्चिम उपनगरात – ६० मिमी इतक्या पावसाची नोंद पालिका पर्जन्य जलमापक यंत्रावर करण्यात आली आहे.

दरम्यान, आगामी २४ तासांत शहर व उपनगर भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची आणि काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस (heavy rain) पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे.

सखल भागात साचले पाणी

गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे हिंदमाता, किंग्जसर्कल, सायन, मिलन सब वे, चेंबूर, कमानी काडी सखल भागात काही प्रमाणात पाणी (water logging) साचले. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला. बेस्ट व इतर वाहनांची वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.

२३ ठिकाणी झाडे/ फांद्या याची पडझड

मुसळधार पावसाच्या तडाख्यात शहर भागात पाच ठिकाणी, पश्चिम उपनगरात नऊ ठिकाणी व पूर्व उपनगरात नऊ ठिकाणी अशा २३ ठिकाणी झाडे/ फांद्या यांची पडझड झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

त्याचप्रमाणे, दोन ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत. तसेच, शहर भागात तीन ठिकाणी, पूर्व उपनगरात एका ठिकाणी अशा चार ठिकाणी घरांच्या पडझडीच्या घटना घडल्या आहेत. मात्र या घटनांत कोणीही जखमी झालेले नाही.

पेडर रोड येथे दरड कोसळली

मुंबईत पावसाची संततधार अधूनमधून मुसळधार बरसात सुरू आहे. त्यातच पेडर रोड, कॅडबरी हाऊस येथे इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास दरड कोसळली (landslide). तसेच, नजीकच्या रस्त्याच्या पदपथाला तडे गेले आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या इमारतीत राहणारे रहिवाशी काहीसे भयभीत झाले आहेत.

गतवर्षी मलबार हिल टेकडी येथे भूस्खलन होऊन भिंत व दरड कोसळली होती. या ठिकाणी पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर काम करून तेथील परिस्थिती पूर्ववत करण्याचे काम जवळजवळ पूर्ण केले आहे. या कामाची माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी नुकतीच पाहणी केली होती. त्यामुळे प्रशासनाने, भूगर्भशास्त्रज्ञ व आयआयटीच्या (IIT) तज्ज्ञांना घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पाचारण केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here