@maharashtracity
४० वयोगटातील महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे वाढते प्रमाण
मुंबई: मुंबईत २०१६ ते २०२१ या पाच वर्षात मुंबईत ४६५ महिलांना स्तनाचा कर्करोग झाल्याचे निरीक्षण मुंबईतील एसीआय कम्बाला हिल हॉस्पिटलने (ACI Cumballa Hill Hospital) मांडले आहे.
या हॉस्पिटलकडून स्तन कर्करोग अभ्यास अहवाल मांडण्यात आला. त्यानुसार चाळीशीपार केलेल्या महिलांची संख्या यात अधिक असून ५० वयापेक्षा जास्त महिलांची संख्या २९५ इतकी असल्याचे सांगण्यात आले.
विशेष म्हणजे स्तनांचा कर्करोग लॉकडाऊनच्या काळात (Increase of breast cancer during corona pandemic) अधिक वाढल्याचे दिसून आले. कोरोना काळातील एप्रिल २०२० ते जुलै २०२१ लॉकडाऊनच्या काळात ८० नवीन रूग्णांची नोंद झाली.
यातील नऊ रूग्ण ४० वयापेक्षा जास्त असून २३ रूग्ण ४१ ते ४९ वयोगटातील आहेत. तर उर्वरित ४८ रूग्ण पन्नाशीच्या पुढचे आहेत असे
एसीआय कम्बाला हिल हॉस्पिटलचे सल्लागार सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉ. धैर्यशील सावंत यांनी सांगितले.
अनेकदा महिला उपचारासाठी उशिरा येत असल्याने निदान ही उशिरा होते. तोपर्यंत कर्करोगाने तिसरा किंवा चौथा टप्पा गाठलेला असतो. भारतात स्तनाच्या कर्करोगाचे उशीरा होण्याचे प्रमाण ५० टक्के इतके आहे.
यावर बोलताना ऑन्कोप्लास्टिक ब्रेस्ट सर्जन डॉ.संदीप बिपटे यांनी सांगितले की, प्रत्येक महिलेने वयाच्या विशीनंतर स्तनाची नियमित तपासणी करून घेणे गरजेचं आहे. तर वयाच्या पन्नाशीनंतर प्रत्येकी दोन वर्षांनी मॅमोग्राफी (Mammography) करून घ्यावी. वेळीच स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्यास उपचार करणं शक्य होत असल्याचे डॉ. बिपटे यांनी स्पष्ट केलं.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) माहितीनुसार, एकूण कॅन्सरग्रस्त महिलांच्या संख्येत ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण २५ ते ३० टक्के आहे. त्यामुळे शहरांमध्ये महिला आरोग्याची मोठी चिंता निर्माण झाली आहे.