आजी-माजी विद्यार्थी डॉक्टर प्राध्यापकांचा वॉकसाठी पुढाकार
@maharashtracity
मुंबई: भारतात रेल्वे सुरु होण्यापूर्वीच वैद्यकीय शिक्षण सेवेची मुहुर्तमेढ जे जे रुग्णालयाच्या (Sir J J Hospital) रुपाने उभारण्यात आली. महाराष्ट्र प्रांतात हे पहिले वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय होते. तर आशिया खंडातदेखील पहिल्या तीन रुग्णालयांत गणले जाते. केईएम रुग्णालयाची (KEM Hospital) स्थापना देखील येथे शिकलेल्या एका डॉक्टरने केली. अशा ऐतिहासिक वास्तूचा इतिहास आता सर्वसामान्यांना खुला करण्यात येणार आहे.
सर्वसामान्यांना या रुग्णालयाची माहिती हेरिटेज वॉकमधून (Heritage Walk) देण्यासाठी येथील आजी, माजी डॉक्टर, प्राध्यापकांनी जबाबदारी उचलली आहे.
यावर माहिती देताना फ्रेंड्स ऑफ ग्रँट मेडिकल कॉलेज (जीएमसी) आणि सर जेजे ग्रुप ऑफ रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले की, वैद्यकीय विद्यार्थी आणि प्राध्यापक हा हेरिटेज वॉक आयोजित करणार आहेत. आगामी महिन्यात याची सुरुवात होणार असून यात संपूर्ण वास्तूचा अनेक वर्षांचा इतिहास, मुंबईतील सर्वात जुनी इमारत व रुग्णालय ही सर्व माहिती या वॉकदरम्यान दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, मुंबई शहरात सर्वात जुने म्हणजेच १७७ वर्षांपूर्वी बांधल्या गेलेल्या जेजे रुग्णालयाचा इतिहास सर्वांना कळावा म्हणून रुग्णालय प्रशासन हेरिटेज वॉक सुरु करणार आहे. यात पहिले २५ विद्यार्थी किंवा डॉक्टर्स जेजे वास्तूशी सर्व माहिती व इतिहास जाणून घेतील त्यानंतर, ते विद्यार्थी येणाऱ्या नागरिकांना व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ही माहिती देतील.
ही इमारत ब्रिटीश काळात (British Era) उभारण्यात आली असून १८४३ सालात बांधायला सुरुवात केल्यावर अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. पुढे मुंबईतील आरोग्य सुविधांसाठी करण्यात आलेले प्रयत्न, वैद्यकीय महाविद्यालये उपलब्ध होणे, हा सर्व इतिहास, जुन्या इमारतींचा इतिहास, वस्तूसंग्रहालयाचा इतिहास असा सर्वतोपरी हेरिटेज वॉक देण्याचा प्रयत्न जेजे रुग्णालयातर्फे केला जाणार आहे. यात हेरिटेज वॉक टीममध्ये २५ सदस्य राहणार असून त्यांना १९५७ बॅचमधील डॉक्टरांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात १९५७ च्या बॅचचे डॉ सुनील पंड्या यांनी ग्रँट मेडिकल कॉलेज (Grant Medical College) आणि सर जेजे रुग्णालयाचा वारसा आणि भारतीय वैद्यकातील योगदान यावर पुस्तके लिहिले असून हे पुस्तक जीएमसी आणि सर जेजे रुग्णालयाच्या इतिहासावर आधारित आहे.