@maharashtracity

मुंबई: ताशी ३० ते ४० प्रति किमी वेगाने वाऱ्यासह पावसाने मुंबई शहर आणि उपनगराला शुक्रवारी झोडपून काढले. गेल्या चार दिवसापासून मुंबईत सायंकाळचा पाऊस सुरु होतो. शुक्रवारी मात्र रायगड ते पालघर जिल्हा असा उत्तर कोकणातील विस्तृत प्रदेश पावसाने काबीज केला होता.

दरम्यान, दुपारी चारनंतर भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून आगामी चार तासात मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला होता. तसेच मुंबईसह रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी शुक्रवारी येलो अलर्ट घोषित करण्यात आला.

एरवीच्या दिवसांप्रमाणेच शुक्रवारचा दिवस ढगाळ असतानाच अचानक सायंकाळी साडेचार वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने सुरुवात केली. यात वेगवान वारे, ढगांचा गडगडाट तसेच विजांचा कडकडाट सुरु झाला. मात्र, या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, तसेच दादर, वांद्रे, परळ, माहिम, प्रभादेवी, तर उपनगरात कुर्ला, सायन, घाटकोपर, विद्याविहार, विक्रोळी, पवई, पार्ले, अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, कांदीवली उपनगरात जोरदार पाऊस सुरु झाला.

दरम्यान, भारतीय हवामान शास्त्र विभागाने मुंबई, पालघर, ठाणे, सातारा सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज केला होता. तसेच मुंबईसाठी येलो अलर्ट घोषित करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here