शुक्रवारीही उष्णतेच्या लाटेचा इशारा
Twitter: @maharashtracity
मुंबई: सत्ता संघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या निर्णयामुळे राज्याचे राजकीय वातावरण तापले असतानाच राज्यासह मुंबईतील वातावरणही तापले होते. गुरुवारी मुंबईतील कमाल तापमान ३६.९ डिग्री सेल्सिअस एवढे उच्चांकी नोंदवून मुंबईकरांची काहिली वाढल्याचे स्पष्ट झाले. गुरुवारी बहुतांश एमएमआर रिजन प्रदेशात कमाल तापमान वाढले. ठाणे येथील कमाल तापमान ३८ डिग्री सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले.
दरम्यान, गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून उष्मांक वाढला होता. काहिलीने मुंबईकरांची तारांबळ उडाली होती. भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारसाठी मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे मुंबईत तापमान वाढ झाली असल्याचे समोर आले. त्याचवेळी दोन दिवसांनी मुंबईतील तापमान सामान्य होणार असल्याचाही अंदाज करण्यात आला आहे.
बुधवारच्या तुलनेत मुंबईत गुरुवारी प्रचंड उष्मा जाणवत होता. तसेच गेले दोन दिवस मुंबई उष्णतेचा तडाखा बसणार असल्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आला होता. मुंबईतील उपनगरातील तापमान ३६.९ डिग्री सेल्सिअस तर शहरातील तापमान ३४.२ डिग्री सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. तर उपनगरात आणि शहरात अनुक्रमे ६८ आणि ७७ टक्के अशी आर्द्रता नोंदविण्यात आली.
दरम्यान, गुरुवारी मुंबईच्या वातावरणातील प्रचंड अस्वस्थता असल्याचे कारण सांगताना मुंबई वेधशाळेच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर म्हणाल्या की, इस्टर्ली वाऱ्याचा प्रभाव तसेच अँटी सायक्लॉन स्थिती अशा दुहेरी वातावरण स्थितीमुळे तापमान वाढ झाली. ही स्थिती एक किंवा दोन दिवस राहणार असून नंतर सामान्य होणार असल्याचे सांगण्यात आले. यातून वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली असल्याचे नायर म्हणाल्या.
उत्तर कोकणातील पालघर, ठाणे आणि मुंबईसाठी दोन दिवस उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला होता. तर उत्तर मध्य महाराष्ट्रासाठी म्हणजेच जळगांव, नंदूरबार आणि नांदेडसाठी अजूनही एक ते दोन दिवस उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला असल्याचे नायर म्हणाल्या. शुक्रवारी उष्ण आणि अस्वस्थ वातावरण राहणार असल्याचे सांगण्यात आले.