@maharashtracity
मुंबई: मुंबईत गुरुवारी शून्य कोरोना मृत्यू नोंद करण्यात आली. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे सलग तीन दिवस मुंबईत शून्य मृत्यू नोंद झाल्याने तिसऱ्या लाटेत मुंबईत शून्य मृत्यूची हॅट्ट्रिक झाल्याचे स्पष्ट झाले.
कोरोना सुरु झाल्यापासून म्हणजेच मार्च २०२० पासून १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तर डिसेंबर २०२१ मध्ये देखील ७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, तिसऱ्या लाट सुरु झाल्यापासून मुंबईत गुरुवारपर्यंत सलग तीन दिवस शून्य मृत्यू नोंदविण्यात आल्याने हॅट्ट्रिक झाली असल्याचे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
मात्र, मुंबईत गुुरुवारी महानगरपालिका (BMC) क्षेत्रात २५९ कोरोना रुग्ण (corona patients) नोंदविण्यात आले. आता मुंबईत एकूण कोरोना रुग्णांची संख्या १०,५४,०७३ झाली आहे. तसेच आता पर्यंत १६६८५ कोरोना मृत्यू झाले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, राज्यात गुरुवारी २,७९७ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,५३,२९१ इतकी झाली आहे.
राज्यात गुरुवारी ६,३८३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७६,८१,९६१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २३,८१६ सक्रिय रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. तसेच राज्यात गुरुवारी ४० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.
राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,६८,७६,७७४ प्रयोगशाळा नमुन्यापैकी ७८,५३,२९१ (१०.२२ टक्के) नमुने पॉझीटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात २,५१,०२३ जण होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. ११४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात गुरुवारी एकही ओमिक्रॉनबाधित रुग्ण (Omicron patients) आढळला नसून आजपर्यंत राज्यात एकूण ४४५६ ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले असल्याचे सांगण्यात आले. यापैकी ३४५५ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी (RTPCR test) निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत एकूण ८९०४ नमुने जनुकीय तपासणीसाठी (Genome Sequencing) पाठवण्यात आले असून त्यापैकी ७९९१ नमुन्याचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. ९१३ नमुन्याचे अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.