अन्य कलेच्या कार्यक्रमांना सवलत लागू न केल्यास आंदोलन
By Sachin Unhalekar
Twitter : @Rav@Sachin
मुंबई: राज्य शासनाने नुकतेच नाटकांच्या प्रयोगासाठी नाट्यगृहांचे भाडे शुल्क 5 हजार रुपये केले असून हे भाडे शुल्क डिसेंबर 2023 पर्यंत लागू असणार आहे. मात्र भाडे शुल्कातील सवलत केवळ नाटक वागळता अन्य कलेच्या सादरीकरणासाठी लागू नसल्याने कलाकारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
कोरोनाच्या काळातही राज्य शासनाने नाट्यगृहांचे भाडे शुल्कात नाटकाच्या सादरीकरणासाठी सवलत दिलेली होती. आता पुन्हा नाटकाच्या सादरीकरणासाठी सवलत देण्यात आली आहे. पण केवळ नाटकांचे प्रयोग करण्यासाठी भाडे शुल्कात सवलत देणे योग्य नाही. नाटकांसोबत अन्य कलेला शासनाने महत्व देऊन त्यांना ही कार्यक्रम करण्यासाठी नाट्यगृहाच्या भाडे शुल्कात सवलत देऊन प्रोत्साहन देणे महत्वाचे आहे, असे मत कलाकारांनी व्यक्त केले आहे.
नाटक ही जशी कला आहे तसेच लोककला, वाद्यवृंद, संगीत, नृत्य या देखील अन्य कला असून त्यांचे कार्यक्रमही नाट्यगृहात होत असतात. यासर्व कलांना नाटकाप्रमाणे प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना भाडे शुल्कात सवलत देणे आवश्यक आहे. नाहीतर केवळ नाटकांसाठी एक न्याय आणि अन्य कलांसाठी दुजाभाव करणे योग्य नाही, असे ही मत कलाकारांनी व्यक्त केले.
प्रत्येक वेळी जर सरकार नाटकांच्या प्रयोगासाठी नाट्यगृहाच्या भाडे शुल्कात सवलत देत असेल तर हे अन्य कलेसाठी अन्यायकारक असल्याने याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिला आहे. यासंबंधी सर्व शासकीय यंत्रणेनेला निवेदन देण्यात येणार आहे. जर सर्वच कलेच्या कार्यक्रमकरिता भाडे शुल्कात सवलत देण्यात आली नाही तर आम्ही सर्व कलाकारांना घेऊन राज्यभरात तीव्र आंदोलन करु, असा इशाराही जाधव यांनी दिला आहे.
राज्य शासनाने नाटकांच्या प्रयोगासाठी नाट्यगृहाच्या भाडे शुल्कात कपात केल्याने प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरचे भाडे शुल्क नाटकांच्या प्रयोगासाठी 5 हजार रुपये करण्यात आले. पण नाटक वगळता अन्य कलेच्या सादरीकरणकरीता भाडे शुल्कात कोणतेही सवलत वा भाडे कमी करण्यात आलेले नाही, असे रवींद्र नाटय मंदिर येथील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.