@maharashtracity
मुंबई: मुंबईतील गोवंडी येथील रफि नगरासह काही ठिकाणी गोवर बाधित रुग्ण आढळल्याने यावर उपाय योजनांसाठी केंद्रीय तज्ज्ञांची टीम मुंबईत दाखल झाली आहे. या केंद्रीय तज्ज्ञांच्या टीमने शुक्रवारी विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन चर्चा केली असल्याचे राज्य आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, केंद्रीय तज्ज्ञांच्या टीममध्ये बंगळुरू तसेच पुणे अशा ठिकाणाहून आलेल्या तीन सदस्यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई गोवंडी येथील रफि नगरात ४८ तासात तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईमध्ये सप्टेंबर तसेच ऑक्टोबर महिन्यापासुन गोवर आजाराचा संसर्ग वाढल्याचे आढळून आले असून एकूण ८४ रुग्णांची नोंद असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. यात एम पूर्व विभागात सर्वाधिक रुग्ण आढळून आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे एम पूर्व विभाग निरीक्षणाखाली अधिक आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्रांची टीम मुंबईत दाखल झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता उपाययोजना सुचविण्यात येतील असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यावर बोलताना राज्य आरोग्य विभागाचे सदस्य यांनी सांगितले की, शुक्रवारी विभागीय वैद्यकीय अधिकारी, अतिरिक्त आयुक्त, कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्यासोबत केंद्रीय तज्ज्ञांच्या बैठका घेण्यात आल्या. संबंधित वॉर्डमध्ये बैठका झाल्या. यात गोवर प्रकरणांची पूर्ण माहिती घेण्यात आली. यावर आता सुचना देण्यात येतील. आता सचिवांसोबत चर्चा होणार यातून योजना आखण्यात येणार आहेत. ही टीम सद्यस्थिती समजून घेत आहेत. कारण गोवरचा गंभीर आऊट ब्रेक मानला जात आहे. या स्थितीचे विश्लेषण करण्यासाठी प्रत्यक्षात घटना स्थळी तज्ज्ञांची टीम जाणार आहे. घटनास्थळीच्या भेटी आगामी दोन दिवस होतील.
बैठक स्वरुप
दरम्यान, केंद्रीय टीम शुक्रवारपासून बैठका घेत असून यात याआधी अशी स्थिती उद्भवली होती का, सद्यस्थिती काय असून स्थिती उद्भवल्यावर काय उपाय योजना राबविण्यात आले, राबविण्यात येणारे उपाय पुरेसे आहेत का किंवा त्यात काही बदल करण्याची गरज आहे का यावर चर्चा होणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
पालिकेकडून राबविण्यात येणारी उपाय योजना
मुंबई महानगरपालिका (BMC) आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत घरोघरी जाऊन गोवर संशयित रुग्णाची सर्वेक्षण करत आहे. संशयित रुग्णांना जिवनसत्व अ देण्यात येत असून गरजेचे असल्यास जवळच्या महापालिका रुग्णालयात उपचारासाठी संदर्भित करण्यात येत आहे. तसेच ९ महीने व १६ महिन्यांच्या बालकांसाठी लसीकरणाचे अतिरिक्त सत्रे आयोजित करण्यात येत असून वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत बालकांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच एम पूर्व विभागात एकूण ६९,२१८ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यासह अतिरिक्त लसीकरण सत्रामध्ये १३० बालकांचे नियमित लसीकरण करण्यात आले.