पश्चिम व पूर्व उपनगर वाहतुकीला सुलभ
एकूण ८,५५० कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प
@maharashtracity
मुंबई: मुंबईत वाहतूक कोंडी ही फार मोठी व गंभीर अशी ज्वलंत समस्या आहे. ही समस्या सोडविणे आणि पश्चिम व पूर्व उपनगराला रस्तेमार्गे वाहतुकीसाठी जोडून मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करणे, इंधन, वेळ, पैशांची बचत करणे या बहुउद्देशाने मुंबई महापालिकेने गोरेगाव – मुलुंड लिंक रोड (जीएमएलआर) प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यावर पश्चिम व पूर्व उपनगर वाहतूक आणखीन सुलभ होणार आहे.
सध्या पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारे सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड हे तीन पर्याय अगोदरच सेवेत आहेत. मात्र, तब्बल ८,५५० कोटी खर्चाचा व भूमिगत बोगद्यांचा समावेश असलेला बहुउद्देशीय गोरेगाव – मुलुंड लिंक रोड (१२.२० किमी लांबीचा) हा चौथा पर्याय जानेवारी २०२५ पर्यन्त मुंबईकरांसाठी महत्वाचा दुवा ठरणार आहे.
गोरेगाव- मुलुंड लिंक रोड प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरे, प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ऐरोली ते कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रापर्यंत मुंबई महानगर वाहतुकीसाठी नवीन लिंक रोड उपलब्ध होणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
तब्बल ८,५५० कोटी रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पाचे काम चार टप्प्यात होणार असून जानेवारी २०२५ पर्यन्त प्रकल्प पूर्णपणे मार्गी लागेल. या प्रकल्पाअंतर्गत, गोरेगाव- मुलुंड लिंक रोडची एकूण लांबी १२.२० किमी आहे.
यामध्ये, उन्नत उड्डाणपूल ४.३७ किमी, ट्विन बोगदा ४.७० किमी, बॉक्स बोगदा १.६० किमी लांबीचा आहे.
चार टप्प्यात अशी होणार कामे
गोरेगाव- मुलुंड लिंक रोड प्रकल्प १२.२० किमी लांबीचा आहे. हा प्रकल्प चार टप्प्यात प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यात नाहूर रेल्वे स्टेशनवर उड्डाणपूलाचे २०२ कोटी रुपयांचे बांधकाम मे २०२३ पर्यन्त पूर्ण करण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात प्रस्तावित बोगद्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या मुलुंड आणि गोरेगांव येथील रस्ता रुंदीकरणाचे काम मे २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात, प्रमुख चौकांची सुधारणा करण्यात येणार आहे. यात फिल्मसिटी रस्त्यावरील रत्नागिरी हॉटेल जंक्शन येथील १.२६ कि.मी. लांबीच्या उड्डाणपूल आणि खिंडीपाडा तानसा पाईपलाईन येथील त्रिस्तरिय चक्रिय मार्गासह (रोटरी) एलबीएस रोड जंक्शन ते नाहूर रेल्वे उड्डाणपूलापर्यंतच्या १.८९ कि.मी. लांबीचा उड्डाणपूल प्रस्तावित आहे. तसेच, या टप्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली दुहेरी बोगदा ,पेटी बोगद्यासह प्रस्तावित आहे. यामध्ये, १३ मीटर व्यासाचा ४.७० कि.मी. लांबीचा बोगदा, चित्रनगरी परिसरामध्ये १.६ किमी लांबीचा पेटी बोगदा व इतर कामे आदींसाठी ६,३२२ कोटी खर्च येणार आहे.
चौथ्या टप्प्यात पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावरील व्यवस्थेची कामे करण्यात येणार आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या प्रस्तावित भूमिगत बोगद्याचे काम प्रगतीपथावर असून पूर्व द्रुतगती मार्गावरील उड्डाण पूलावरुन जाणाऱ्या द्वितीय स्तरावरील १.२२ किमी लांबीच्या उड्डाणपूलाचे बांधकाम आणि पश्चिम द्रुतगती मार्ग छेदणाऱ्या भूयारी मार्गाचे बांधकाम हाती घेण्याचे प्रस्तावित आहे.