कोरोनाचे बदलते रूप ओळखणारे यंत्र मुंबईत दाखल
@maharashtracity
मुंबई: जगभरात थैमान घालणाऱ्या ‘कोरोना’ विषाणूचे सतत बदलणारे रूप ओळखण्यासाठी विषाणूचे नमुने आता पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत (NIV lab) पाठविण्याची गरज भासणार नाही. कारण की, या कोरोनाचे रूप ओळखणारे यंत्र सिंगापूर (Singapore) येथून मुंबई (Mumbai) विमानतळावर दाखल झाले आहे.
हे यंत्र लवकरच पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba hospital) आणण्यात येणार असून त्यावर काही दिवस चाचण्या घेतल्यानंतर या यंत्राच्या नियमित वापरास सुरुवात करण्यात येणार आहे.
विमानतळावरील कस्टम क्लिअरिंग झाल्यानंतर हे यंत्र दोन दिवसात कस्तुरबा रुग्णालयात आणले जाईल. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईतच ‘जिनोमिक सिक्वेन्सिंग’ चाचण्या केल्या जातील. या संदर्भातील माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
गेल्या फेब्रुवारी २०२० पासून मुंबईसह भारतात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा विषाणू सतत आपले रूप बदलत आहे. मात्र या कोरोनाचे बदलते रूप ‘जिनोमिक सिक्वेन्सिंग’ चाचण्यांद्वारे ओळ्खता येते. मात्र सध्या या चाचण्या पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेत केल्या जातात. त्यासाठी मुंबईमधून कोरोना विषाणूचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावे लागतात.
राज्य सरकार व मुंबई महापालिकेने (BMC) पुणे (Pune) ऐवजी पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातच या कोरोनाचे रूप बदलणारे यंत्र सिंगापूर येथून आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे यंत्र आता मुंबई विमानतळावर दाखल झाले आहे.
वास्तविक, हे यंत्र जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईत दाखल होणार होते. मात्र परदेशातून कार्गो सर्व्हिसला परवानगी नसल्याने हे यंत्र परदेशातच अडकले होते. आता मुंबई विमानतळावरील सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर ते पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात आणण्यात येणार आहे.
दोन ते तीन दिवस त्याची चाचणी केली जाईल. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईतच ‘जिनोमिक सिक्वेन्सिंग’ चा वापर करून चाचण्या केल्या जातील, अशी माहिती काकाणी यांनी दिली.