शालेय इमारतीचे नुकसान

जखमींवर सायन रुग्णालयात उपचार 

गॅस सिलिंडर स्फोटाचे कारण अज्ञात 

@maharashtracity

मुंबई: दादर (पश्चिम) येथील प्रसिद्ध छबिलदास शाळेमध्ये बुधवारी पहाटेच्या सुमारास सर्वजण झोपेत असताना अक्षिकर ताम्हाणे कम्युनिटी हॉलमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत शाळेतील तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. तर शालेय इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. या स्फोटाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. जखमींवर नजीकच्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

या घटनेत जखमी झालेल्या कामगारांची नावे भरत सिंग (२६ वर्षे / ६० ते ७० टक्के भाजला) , जावेद अली (३८ वर्षे / डोक्याला मार) आणि गोपाळ साहू (५० वर्षे / जखमी) अशी असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. घटना घडली त्यावेळी शाळा बंद होती. शाळा सुरू असताना ही दुर्घटना घडली असती तर जखमींची संख्या वाढली असती अथवा जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता आली नसती. मात्र शाळेची वित्तीय हानी झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, दादर ( प.), तळमजला अधिक दोन मजली छबिलदास शाळेत बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील अक्षिकर ताम्हाणे कम्युनिटी हॉलमध्ये किचनमधील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी इलेक्ट्रिक वायरिंग, उपकरणे, कपडे आदिना आग लागली होती. या घटनेत शालेय इमारतीचा दुसऱ्या मजल्यावरील काही भाग कोसळला. तर काही भाग हा पडण्याच्या स्थितीत म्हणजे धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले.

या स्फोटाच्या घटनेत भरत सिंग (२६), जावेद अली (३८) आणि गोपाळ साहू (५०) हे तीन कामगार जखमी झाले. त्यांना स्थानिक नागरिकांनी तात्काळ नजीकच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटना घडल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन दोन फायर इंजिन, एक जंबो वॉटर टँकर यांच्या साहाय्याने मदतकार्य सुरू केले. तसेच, अग्निशमन दल, पालिका कर्मचारी यांनी शालेय इमारतीचा धोकादायक स्थितीतील भाग तोडण्याचे काम सुरू केले. 

या दुर्घटनेत आणखीन कोणी जखमी झाले की काय याचा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून कसून शोध घेण्यात आला. तसेच, आग का व कशी काय लागली याचा तपास अग्निशमन दलाचे संबंधित अधिकारी, पोलीस यांच्याकडून सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here