न्युमोनियासह न्युमोकोकल आजारांपासून संरक्षणासाठी पीसीव्ही लस उपयुक्त

पालिकेच्या रुग्णालये, आरोग्य केंद्रे, दवाखान्यात पीसीव्ही लस मोफत

@maharashtracity

मुंबई: मुंबईत सध्या कोरोनावरील लसीकरण मोहीम सुरू आहे. तर दुसरीकडे पालिकेने एक वर्षाखालील लहान मुलांना न्युमोनियासह (pneumonia) न्युमोकोकल आजारांपासून संरक्षणा देण्यासाठी उपयुक्त ठरणारी ‘पीसीव्ही लस’ मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या सर्व रुग्णालये, आरोग्य केंद्रे, दवाखान्यात ही ‘पीसीव्ही लस’ मोफत देण्यास लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.

मुंबईत एक वर्षाखालील लहान मुलांची संख्‍या अंदाजे दीड लाखापेक्षा अधिक आहे. या मुलांना, न्‍युमोनिया आणि इतर न्‍युमोकोकल आजारांपासुन संरक्षण देणारी ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन’ देण्‍यास लवकरच सुरूवात करण्‍यात येणार आहे.

पालिका आरोग्य खात्यामार्फत मुंबईत लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत बीसीजी, पोलिओ, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हेपेटाइसिस-बी, एच इन्फ्लुएंझा-बी, रोटा वायरस, गोवर, रुबेला या आजारावर प्रतिबंधक लस देण्यात येते. राज्य शासनाच्या निर्देशानुसार या लसीकरण मोहिमेत, एक वर्षाखालील लहान मुलांना न्युमोकोकल न्युमोनिया आणि इतर न्युमोकोकल आजारापासून संरक्षण देणाऱ्या ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन’ या नवीन लसीचाही समावेश करण्यात आला आहे.

या संदर्भातील माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी दिली आहे.

महापालिकेच्या आरोग्य खात्याशी संबंधित कर्मचा-यांना या लसीकरणासाठी तज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्‍यात येत आहे. तसेच, याबाबत खास जनजागृती करण्‍यात येत आहे. तसेच लस, सिरींजेस व इतर सामुग्रीचे वितरण याची व्‍यवस्‍था करण्‍यात येत आहे. यानंतर राज्‍य शासनाच्‍या निर्देशानुसार बालकांचे प्रत्‍यक्ष लसीकरण सुरू करण्‍यात येणार आहे.

एक लाख मुलांचा दुर्दैवी मृत्यू

भारतात सन २०१० मध्ये न्युमोकोकल या आजाराने पाच वर्षाखालील अंदाजे १ लाख बालमृत्यूंची नोंद झाली होती. तर त्याचवर्षी देशभरात ५ ते ६ लाख बालकांना न्युमोनिया हा गंभीर आजार झाल्याची नोंद देखील झाली होती.

स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया या जीवाणूमुळे न्युमोकोकल हा संसर्गजन्य आजार होतो हा आजार म्‍हणजे फुफुसांना होणारा एक प्रकारचा संसर्ग आहे. या आजारामुळे बालकांना श्वास घ्यायला त्रास होतो, धाप लागते, ताप येतो व खोकलाही येतो तसेच जर सदर संसर्ग गंभीर स्वरूपाचा असल्‍यास तर मेंदुज्वर, नुमोनिया सेप्टीसीमीया अशा कारणामुळे मृत्यू देखील ओढवू शकतो.

ही गंभीर बाब पाहता, भारत सरकारने न्युमोकोकल आजारापासुन मुलांचे संरक्षण करण्‍यासाठी सार्वत्रिक लसीकरणामध्ये ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन’ ही लस उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यानुसार,मुंबई महापालिकेतील आरोग्‍य केंद्रे, प्रमुख व उपनगरीय रुग्णालय तसेच शासकीय रुग्णालयामध्‍येही सदर लस मोफत देण्यात येणार आहे.

पीसीव्ही लसीचे वेळापत्रक

पीसीव्ही लस (PVC vaccine) तीन डोसमध्ये दिली जाणार आहे. २ प्रायमरी डोस वयाच्या ६ आठवड्यात, १४ आठवड्यात आणि १ बूस्टर डोस (booster dose) वयाच्या ९ व्या महिन्यात देण्यात येईल. ही लस लहान मुलांना उजव्‍या मांडीवर स्‍नायुमध्‍ये दिली जाणार आहे. पहिल्या डोससाठी येणार्‍या १ वर्षाच्या आतील बाळाला पोलिओ, रोटा, आयपीव्ही, पेंटा या लसी सोबत देण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here