मुंबई मनपा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीचे आश्वासन

By Sachin Unhalekar 

Twitter: @Sachin2Rav

मुंबई: आगामी मुंबई महापालिका निवडणूक (BMC election) आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार असून मोफत पाणी, वीज, आरोग्य सेवेसोबत मोफत शिक्षण नागरिकांना देणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे (AAP) प्रवक्ते डॉ. संजय कांबळे – बापेरकर यांनी Maharashtra.city शी बोलताना दिली.

डॉ कांबळे यांनी सांगितले की, मुंबई महापालिका निवडणुकीकरीता आम आदमी पार्टीची तयारी सुरू झाली आहे. आम आदमी पार्टीतर्फे जात आणि धर्माला महत्व न देता स्थानिक पातळीवरील समस्यांची ज्यांना जाण आहे, अशा उमेदवारांना उमेदवारी देण्यासाठी प्राध्यान्य देण्यात येणार आहे. सुशिक्षित, उच्च सुशिक्षित उमेदवारांनाही उमेदवारी देण्यासाठी आम आदमी पार्टी प्राध्यान्य देणार आहे. निवडीकरिता इच्छुक उमेदवांच्या मुलाखती घेण्यास आम आदमी पार्टीच्या (Aam Aadami Party) मुख्य कार्यालयात सुरुवात झालेली आहे. 

आतापर्यंत झालेल्या मुलाखतीत १०० उमेदवार असे मिळाले आहेत, जे पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सक्षम आहेत. तसेच विभागीय सदस्यनोंदणी करिता आम आदमी पार्टीतर्फे मुंबईत काम सुरु असून आतापर्यंत एक लाख सदस्य नोंदणी करण्यात आलेली आहे, असे आम आदमी पार्टीचे प्रवक्ते कांबळे – बापेरकर यांनी सांगितले.

आगामी मुंबई महापालिका निवडणूकीत आम आदमी पार्टीचा झेंडा पालिकेवर फडकल्यास नागरिकांना मोफत पाणी, वीज, आरोग्य सेवासोबत मोफत शिक्षण देणार आहे. त्यामुळे मुंबईच्या नागरिकांनी आम आदमी पार्टीला बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन कांबळे – बापेरकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here