सैफी रुग्णालय बनावट इंजेक्शन घोटाळा प्रकरण
Twitter: @maharashtracity
मुंबई: मुंबई चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयातील मेडिकल स्टोअरमधून वापरलेल्या इंजेक्शनमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण घडले. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून या प्रकरणाचा छडा लावला जात आहे. या गुन्ह्यातील आरोपींच्या मेडिकल स्टोअर मालकांना कारणे दाखवा नोटीस एफडीए बजावणार आहे. तसेच मेडिकल स्टोअरचा परवानाही तात्पुरत्या काळासाठी बंद करण्याबाबत येत्या दिवसांत निर्णय घेणार असल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांची कारवाई पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे आरोपींविरोधात न्यायालयीन खटला दाखल जाणार आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांच्या तक्रारीची दखल घेत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात ऑक्टोबर महिन्यात ५६ वर्षीय रुग्णाला चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाला उपचारादम्यान ऑरोफर एफसीएम इंजेक्शन दिले गेले. या इंजेक्शननंतर रुग्णाची प्रकृती बिघडल्याने त्याला अतिदक्षता विभागाने हलवण्यात आले. दोन दिवसानंतर रुग्णाचा मृत्यू झाला.
या प्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी अन्न व औषध प्रशासनाकडे रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत सैफी रुग्णालयातील इंजेक्शनचे नमुने तसेच देशभरातील बाजारात उपलब्ध असलेले नमुने एफडीएने संबंधित कंपनीला परत घेण्याचे निर्देश दिले. जानेवारी महिन्यात प्रयोगशाळेचा अहवाल मिळाला. यावर अन्न व औषध प्रशासनाने व्ही. पी. रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करुन घेतली. त्याचवेळी सैफी रुग्णालयातील मेडिकल स्टोअरला नोटीस बजावण्यात आली.
पोलिसांनी रुग्णालयातील मेडिकल स्टोअरसह ठाणे, पुणे, औरंगाबाद तसेच दिल्लीतील ११ फार्मा सेंटर व पुरवठादारांविरोधात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील आरोपींच्या मेडिकल स्टोअर मालकांना कारणे दाखवा नोटीस एफडीए बजावणार आहे. मेडिकल स्टोअरचा परवानाही तात्पुरत्या काळासाठी बंद करण्याबाबत आगामी दिवसांत निर्णय घेणार असल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.