@maharashtracity
मुंबई: सुदृढ आरोग्यासाठी अन्न शुद्धता आणि जागरूकता करण्याच्या दिशेने व्यापक प्रयत्न करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिले. त्यासाठी विविध अन्न घटकांचे नमुने वेळोवेळी तपासले जाऊन लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची सूचना देखील यावेळी करण्यात आली.
भारतीय खाद्य संरक्षण आणि मानके प्राधिकरणाच्या अध्यक्षा रीटा तेवटीया यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने बुधवारी मुख्यमंत्री ठाकरे यांची वर्षा येथील समिती कक्षात भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
कोरोना विषाणुने आरोग्य रक्षणाचे धडे घालून दिले असून सुदृढ आरोग्यासाठी अन्न सुरक्षितता व स्वच्छता देखील अतिशय महत्वाची आहे. त्यासाठी अन्न घटकांची शुद्धता तपासणे आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतीय खाद्य संरक्षण व मानके प्राधिकरण आणि आरोग्य विभाग एकत्रित येऊन प्रयत्न करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
अन्न शुद्धता तपासण्यासाठी आरोग्य विभागाकडे असलेल्या असलेल्या चाचणी प्रयोगशाळांची मदत होणार आहे. तसें आदेश मुख्यमंत्र्यांनी या बैठकी दरम्यान दिले आहेत. तसेच राज्य आणि जिल्हास्तरावर अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या आढावा बैठका नियमित घेतल्या जाव्यात.
सामान्यांचे आरोग्य रक्षण हा प्रधान्याचा विषय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. यात भारतीय खाद्य संरक्षण आणि मानके प्राधिकरण यांच्यासमवेत राज्य सरकार करत असलेल्या सामंजस्य करारामुळे राज्याला अन्न नमुने तपासणी प्रयोगशाळा तसेच इतर उपक्रमांसाठी निधी उपलब्ध होऊ शकेल असे शिष्टमंडळाच्यावतीने सांगण्यात आले.
राज्यात नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हास्तरावर अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या अनुषंगाने राज्य सरकारच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्त सिंग यांनी यावेळी दिली.
भारतीय खाद्य संरक्षण प्राधिकरणाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजना आणि उपक्रमांची माहिती तेवटीया यांनी यावेळी दिली.