By Sachin Unhalekar
Twitter: @Sachin2Rav
मुंबई: अग्निशमन विभागात भरतीसाठी शनिवारी मुंबईत आलेल्या महिला उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित होत्या की नाही याची शहानिशा व्हिडियो रेकॉर्डींगची बघून केली जाईल आणि खात्री पटल्यानंतरच या महिला उमेदवार यांना उंचीच्या प्राथमिक चाचणीत पात्र ठरवून पुढील चाचणी करिता अनुमती दिली जाईल, असे स्पष्टीकरण प्रमुख अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांनी केले आहे.
दहिसर येथील भावदेवी मैदानात शनिवारी (4 फेब्रुवारी 2023) रोजी महिला उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू होती. यावेळी उपस्थित सात हजार महिला उमेदवारांना प्रवेश देण्यात आला. उंचीच्या प्राथमिक चाचणीत तीन हजार 318 महिला उमेदवारांना पुढील चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यांची चाचणी सुरु असताना उंचीच्या प्राथमिक चाचणीत अपात्र झाल्यामुळे पुढील चाचणीसाठी प्रवेश नाकारण्यात आलेल्या महिला उमेदवारांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ जमुन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी ताबा घेऊन हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सुमारे 150 जणांचा जमाव व अपात्र महिला उमेदवार व त्यांचे नातेवाईक यांनी तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेत मुख्य प्रवेशद्वार व सरंक्षक अडथळे तोडण्यास सुरुवात केली. यादरम्यान जमावातील एका पुरुषाने महिला पोलीस शिपायाला पकडून धक्काबुक्की केली. त्या पुरुषास पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान यावेळी पोलिसांनी जमावस लाठीमाराचा इशारा दिल्यावर एकत्रित आलेला जमाव नियंत्रित झाला.
याबाबतीत संबंधित पोलीस उपायुक्त यांना अवगत करण्यात येऊन अतिरिक्त पोलीस बलाची तरदूत करण्यात आली. त्यामुळे रहदारी सुरळीत झाली. यानंतर पोलीस उपायुक्त बंसल व सामाजिक वरिष्ठ नागरिकांच्या विनंतीनुसार डॉक्टर व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी उंचीच्या प्राथमिक चाचणीतील 10 अनुत्तीर्ण महिला उमेदवारांची उंचीची फेरचाचणी केली. त्या उमेदवारांना या तांत्रिक मुद्द्यावर अपात्र करण्यात आले आहे. याची पुनश्च खातरजमा करण्यात आली. याबाबतीत जमावास माहिती देऊन अवगत केल्यानंतर वादाचा मुद्दा सोडविण्यात आला. यानंतर 3318 पात्र महिला उमेदवारांची पुढील चाचणी प्रक्रिया सुरळीत सुरु झाली.
उंचीचा मुद्दा सोडविण्यात आला तरी जमाव परत जाण्यास तयार नव्हता. त्यामुळे विचारविनिमय करुन प्रवेशद्वारा बाहेरील सर्व महिला उमेदवारांना आतमध्ये प्रवेश देऊन पुनश्च त्यांची उंची मोजण्यात आली. यातील सर्व अपात्र महिला उमेदवारांना वगळण्यात आले असून 16 पात्र ठरलेल्या महिला उमेदवारांना 14 फेब्रुवारी 2023 या पुढील तारखेस बोलविण्यात आले आहे. या नंतर सर्व पात्र ठरलेल्या महिला उमेदवारांना आज झालेल्या व्हिडीओ रेकॉर्डींगची तपासणी करुन त्या सर्व महिला शनिवारी सकाळी 8 वाजून 20 मिनिटे आत उपस्थित होत्या याची शहानिशा करुन खातरजमा केली जाईल. या पात्र महिला उमेदवार सकाळी 8. 20 वाजेच्या आत उपस्थित होत्या हे व्हिडीओ रेकॉर्डींगमध्ये सिद्ध झाले तर त्यांना उंचीच्या प्राथमिक चाचणीत पात्र ठरवून पुढील चाचणीकरिता अनुमती दिली जाईल, असे स्पष्टीकरण प्रमुख अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांनी केले आहे.