Twitter :
मुंबई
मुंबईची जीवनवाहिनी ठरलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असून २० वर्ष सेवा केलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांना प्रमोशन नसल्याची खंत ते व्यक्त करत आहेत. तसेच बेस्टमध्ये जागा रिक्त असून देखील नवीन भरती करत नाही. सेवा ज्येष्ठता असून देखील त्या जागी इतर कामे दिली जात असल्याची तक्रार ऐकायला मिळत आहे. बेस्ट समितीचे ज्येष्ठ सदस्य सुनील गणाचार्य यांनी देखील या बाबीला दुजोरा देऊन कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतुष्टता असल्याचे सांगितले आहे.
२० ते २५ वर्ष बेस्ट सेवेत होऊन देखील खंत मांडताना बेस्ट कर्मचाऱ्यांनी सागितले की, इतकी वर्ष प्रामाणिकपणे सेवा करूनही त्यांना बढती अथवा पदोन्नती मिळत नाही. जो कामगार आपली सेवा प्रामाणिकपणे करूनही कर्मचाऱ्याला कित्येक वर्ष प्रमोशन नाही. अधिकारी वर्गाला झटपट प्रमोशन व कामगार वर्ग प्रमोशनपासून कित्येक वर्ष वंचित असल्याची कैफियत मांडताना बेस्ट कर्मचाऱ्यांनी सांगितले. जे अधिकारी वर्ग १० ते १५ वर्ष सेवा करून एकाच पदावर होते त्या अधिकाऱ्यांना २ प्रमोशन देऊन त्यांना मोठ्या पदावर बढती व पदोन्नती देवू केली.
जे कामगार ज्यांनी १५ ते २० वर्ष सेवा केली आहे, अशांना इतक्या वर्षात एकही प्रमोशन नसल्याची बाब कर्मचाऱ्यांनी सांगितली. त्यामुळे ज्याप्रमाणे अधिकारी वर्गास २ प्रमोशन त्याचप्रमाणे जे ज्येष्ठ वाहक यांची २५ ते ३५ वर्ष सेवा झाली आहे त्यांना २ प्रमोशन (राईटचे) देण्यात यावे. कारण राईटच्या ५०० ते १००० जागा रिक्त आहेत आणि इतर ठिकाणी १००० जागा रिक्त असून तेथे २५ ते ३५ वर्ष सेवा झालेल्या ज्येष्ठ वाहकांना पदोन्नती देण्यात यावी अशी मागणी कर्मचारी करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच १० ते १५ वर्ष सेवा झालेल्या, चालकांना राईड, क्लार्क इतर ठिकाणी त्यांना तात्पुरती भरती केली. सेवा ज्येष्ठतानुसार ज्येष्ठवाहक २५ ते ३५ वर्ष सेवा झालेल्या कामगारांना राईड, क्लार्क व इतर ठिकाणी २ प्रमोशन देऊन सेवाज्येष्ठ कामगारांना मदत करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.
बेस्ट मध्ये प्रमोशन पॉलिसी होती. २० ते २५ वर्ष झाली की चालक वाहकांना कराराप्रमाणे पदोन्नती देण्यात येत होती. मात्र आर्थिक काटकसरीच्या नावाखाली हे सर्व बंद केले. तेव्हापासून कर्मचारी यातना सहन करत आहेत. पदोन्नती, पगारवाढ बंद केल्याने बेस्ट कर्मचारी मानसिक दृष्ट्या खचला आहे.
– सुनिल गणाचार्य, ज्येष्ठ सदस्य, बेस्ट समिती.