X : @Rav2Sachin
मुंबई : अग्निशामकांच्या बनावट भरती प्रक्रियेचा प्रकार नुकताच उजेडात आला आहे. यामध्ये पाच जणांविरुद्ध आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला गेला आहे. आता आणखी एक गंभीर प्रकरण महाराष्ट्रसिटी च्या हाती लागले आहे. अग्निशामकांच्या भरती प्रक्रियेला एक वर्ष पूर्ण होऊन निवड झालेल्या उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण करुनही त्यांना कामावर घेण्यात आलेले नाही.
दरम्यान, एकीकडे अग्निशमन दलाच्या भरती प्रक्रियेची प्रतिक्षा यादी (waiting list of candidates) रद्द करण्यात आली असतानाही प्रशिक्षण (training) पूर्ण झालेल्या उमेदवारांना कामावर रुजू करुन का घेण्यात आले नाही, याबाबत संशय व्यक्त होत आहे.
याआधी ‘अग्निशमन दलाच्या नव्या भरतीच्या जवानांना ना भत्ता ना वेतन’ या मथळ्याखाली महाराष्ट्रसिटी (Maharashtra.city) ने 6 मार्च 2024 रोजी प्रकाशित केलेल्या बातमीत पहिल्या टप्प्यात प्रशिक्षणात उत्तीर्ण झालेल्या 459 पुरुष आणि महिला उमेदवारांना 23 जानेवारी 2024 पासून अग्निशमन दलाच्या (fire brigade) सेवेत दाखल करण्यात आले आहे. या सर्व उमेदवारांना अग्निशमन दलाच्या 35 फायर स्टेशन आणि कंट्रोल रुममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
पण 23 जानेवारी 2024 पासून 459 पुरुष आणि महिला उमेदवारांना सेवेत दाखल करुन त्यांना वेतन देण्यात आलेले नाही. नवीन भरती झालेल्या उमेदवारांना 40 हजार रुपये वेतन आहे. प्रत्येक उमेदवाराला प्रशिक्षण भत्ता 3 हजार रुपये महिना आहे. एका उमेदवाराचे 6 महिन्याचे प्रशिक्षण भत्ता 18 हजार रुपये आहे. मात्र पहिल्या टप्प्यातील आणि दुसऱ्या टप्प्यातील एकाही उमेदवाराला प्रशिक्षण भत्ता आणि वेतन मिळालेले नाही, अशी धक्कादायक माहिती महाराष्ट्रसिटीने समोर आणली होती. या बातमीनंतर अलीकडेच त्यांचे वेतन आणि भत्ता देण्यास सुरुवात झाली.
अशा ढिसाळ कारभारामुळेच की काय अद्याप शेवटच्या बॅच मधील 277 उमेदवारांची भरती प्रक्रियेत निवड होऊन त्यांचे 6 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. प्रशिक्षण पूर्ण होऊन आज दोन महिने उलटूनही उमेदवारांना कामावर रुजू करुन घेण्यात आलेले नाही.
याबाबत पालिकेच्या (BMC) वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले की, आम्ही दोन दिवसात प्रशिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांना कामावर घेऊ.