@maharashtracity

मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि न्याय हक्कासाठी २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता वडाळा आगार येथे
भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी संलग्न बेस्ट कामगार संघाच्या वतीने तीव्र स्वरूपाची निदर्शने करण्यात येणार आहेत. (Protest by BEST Kamgar Sangh)

यासंदर्भातील माहिती भाजपचे बेस्ट समितीवरील ज्येष्ठ सदस्य सुनील गणाचार्य (Sunil Ganacharya) यांनी दिली आहे.

बेस्ट उपक्रमाला गेल्या शंभरहून अधिक वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. ‘बेस्ट’ बस ही एकेकाळी मुंबईच्या रस्त्याची शान मानली जायची. मात्र आता सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) व बेस्ट प्रशासन यांच्या हलगर्जीपणामुळे बेस्टची बससेवा कोट्यवधी रुपयांनी तोट्यात सुरू आहे.

तसेच, गेल्या काही वर्षांपासून बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग हा कोट्यवधी रुपयांनी तोट्यात सुरू होता. आता बेस्ट परिवहन विभागाबरोबरच वीज विभागही यंदा कोट्यवधी रुपयांच्या तोट्यात गेला आहे.

बेस्ट उपक्रम कोट्यवधी रुपयांनी तोट्यात असताना, अपुरा आणि अनियमित पगार आणि कामाचा वाढता ताण, अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांची होणारी पिळवणूक, छळवणूक आदि विविध समस्यांशी कर्मचाऱ्यांना झगडावे लागत आहे. मात्र, सत्ताधारी आणि प्रशासन हे मुग गिळून गप्प आहेत.

बेस्ट उपक्रमाला तोट्यातून बाहेर काढून नफ्यात आणण्यात सत्ताधारी पक्ष व बेस्ट प्रशासन यांना सपशेल अपयश आलेले आहे, अशी टीका सुनील गणाचार्य यांनी केली आहे.

बेस्टमधील कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या मुजोर, मुर्दाड सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी ही निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी माहिती बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी दिली.

यावेळी बेस्ट समिती सदस्य प्रकाश गंगाधरे, गणेश खणकर, अरविंद कागिणकर, राजेश हाटले, शिवकुमार झा उपस्थित राहणार आहेत.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या

बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या “अ”अर्थसंकल्पात विलीनीकरण करणे.

बेस्ट बसचालक इतर आस्थापनासाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव मागे घेणे.

बेस्टने स्वतःच्या मालकीच्या बस ताफा कायमस्वरूपी राखणे.

कोविड चार्जशीट रद्द करणे.

कोविड भत्ता व एल.टी.ए. लवकरात लवकर द्यावा.

बेस्ट कामगारांना सन २०२१ वर्षाचा सानुग्रह अनुदान ( दिवाळी बोनस) मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्यात यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here