भाजपा शिष्ठमंडळाची आयुक्तांशी भेट ; नालेसफाई कामांचा अहवाल सादर

नालेसफाई १० टक्केही झालेली नसल्याचा दावा

नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी “विशेष टास्क फोर्स” नेमण्याची मागणी

@maharashtracity

मुंबई: मुंबईसह राज्यात महाविकास आघाडीचे (MVA) नेते, खासदार, आमदार यांच्या घरांवर “ईडी” च्या धाडी पडत असल्याने सध्या राजकीय वर्तुळात “ईडी”च्या कारवाईची जोरदार चर्चा आहे. त्यातच भाजपचे नेते व आमदार ऍड. आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी, मुंबईतील नालेसफाईच्या कामांत हातकी सफाई दाखविणाऱ्या कंत्राटदारांना (Contractor) केवळ ब्लॅकलिस्ट न करता त्यांना “ईडी” च्या दरवाजात उभे करून चांगलाच इंगा दाखविण्यात येईल, अशी सरळसरळ धमकीच दिली आहे.

मुंबई महापालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्ष पदावर कार्यरत असताना शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरावर काही दिवसांपूर्वीच “आयकर” खात्याची धाड पडली होती. त्यावेळी त्या कारवाईची पालिकेत चर्चा होती. आता भाजपचे आशिष शेलार यांनी कंत्राटदारांना ” ईडी” (ED) चा इंगा दाखविण्याची धमकी दिल्यामुळे आता पालिकेतही “ईडी” बाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.

नालेसफाई १० टक्के सुद्धा झालेली नाही

नालेसफाईचे (nullah cleaning) प्रस्ताव स्थायी समितीच्या ७ मार्च रोजीच्या बैठकीत मंजूर न करता सत्ताधारी शिवसेनेने (Shiv Sena) नालेसफाई कामांना व मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून दिले आहे, असा आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी बुधवारी पालिका आयुक्त इकबाल चहल यांची पालिका मुख्यालयात भेट घेऊन केला आहे.

यावेळी, आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भेटलेल्या या शिष्टमंडळामध्ये गटनेते प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde), मनपा पक्षनेते विनोद मिश्रा, प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, नगरसेविका राजेश्री शिरवडकर, उज्वला मोडक, नगरसेवक महादेव शिवगण आदींसह अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) वेलरासू हे देखील उपस्थित होते.

वांद्रे ते दहिसर, कुर्ला ते मुलुंडपर्यन्त भाजपच्या खासदार, आमदार व नगरसेवकांनी एक आठवडा नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. त्यावेळी, अनेक नाले गाळाने, कचऱ्याने भरलेले, तुंबलेले आढळून आले. काही ठिकाणी तर कंत्राटदारांनी नालेसफाईच्या कामांना अद्यापही सुरुवातही केलेली नसल्याचे आढळून आले. एका नाल्यात तर एक कचरा वेचक व्यक्ती नाल्यातील गाळावरून चक्क चालत गेल्याचा धक्कादायक अनुभव आमदार शेलार यांनी आज पत्रकारांना माहिती देताना सांगितला.

मुळात नालेसफाईच्या कामांना १५ – २० दिवस उशीर झालेला असून आतापर्यंत १० टक्केही नालेसफाई झालेली नाही, असा दावा आमदार शेलार यांनी केला आहे. तसेच, नालेसफाईच्या कामांकडे सत्ताधारी व पालिका प्रशासन यांनी दुर्लक्ष केल्याने पावसाळा सुरू होइपर्यंत २५ टक्केही नालेसफाई कामे होणार नसल्याचा व जर पावसाळा अगोदरच सुरू झाल्यास मुंबईची तुंबई होण्याचा इशाराही त्यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.

विशेष टास्क फोर्स नेमण्यात यावा

नालेसफाईची कामे पूर्ण व्हायची असतील तर कामावर लक्ष ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची विशेष टास्क फोर्स (नालेसफाई ) नियुक्त करावी, अशी मागणी आमदार शेलार यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे केली आहे.

तसेच, आय.ए. एस. अधिकाऱ्यांना एसी कार्यालयात बसू न देता त्यांना रस्त्यावर उतरून काम करायला लावावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी आयुक्तांकडे केली. टास्क फोर्सच्या (Task Force) मागणीवर आयुक्त सकारात्मक असल्याचे शेलार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here