Twitter : @vivekbhavsar
मुंबई
महात्मा गांधी आणि महात्मा जोतीबा फुले यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे याला विरोध केला तर मला ट्विटर वर धमकी आली, धारकरी म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने दाभोळकर यांना (जीवे) मारल्याची कबुली देवून मलाही अशाच पद्धतीने ठार मारण्याची धमकी दिली आहे, अशी माहिती विधान सभेत देऊन उद्या माझ्या जीवाला काही झाले तर त्याला जबाबदार कोण असेल असा प्रश्न कोंग्रेस सदस्य यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला. यावर त्यांना पूर्ण सुरक्षा दिली जाईल आणि ज्याने धमकी दिली आहे, त्याला शोधून त्याला जेलमध्ये टाकले जाईल, अशी ग्वाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
संभाजी भिडे यांच्या समर्थकाकडून येत असलेल्या धमक्याकडे यशोमती ठाकूर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. ठाकूर म्हणाल्या की त्या कोंग्रेस पक्षाच्या गेल्या तीन टर्म पासून आमदार आहेत. मनोहर कुलकर्णी यांनी महात्मा गांधी आणि महात्मा फुले यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांच्या पक्षाच्या वैचारिक भूमिकेनुसार त्यांनी भिडे यांना विरोध केला, तर त्यांना ट्विटर च्या माध्यमातून ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या.
यावेळी ठाकूर यांनी त्यांना आलेल्या धमक्यांचे वाक्य वाचून दाखवले. धमकी देणारा कैलास सूर्यवंशी हा त्याला धारकरी म्हणवून घेत असून दाभोळकर यांची हत्या केल्याचा दावा करत आहे. त्यांनी सांगितले की लोकसेवक म्हणून त्यांना संगळीकडे जावे लागते, तेव्हा त्यांच्या जीवला काही झाले तर त्याला जबाबदर कोण असेल?