मुंबई महानगरपालिका निवडणुक समोर ठेवून दौऱ्यांचे नियोजन असल्याचा अंदाज

Twitter: @maharashtracity

मुंबई: निवडणुकांचे पडघम वाजत नसले तरी देखील त्या दिशेने चालण्यास सर्वच पक्षांनी सुरुवात केली आहे. त्यात केंद्रस्थानी मुंबई महानगरपालिका आहे. त्याचमुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांना भेटी देणार असल्याची माहिती समजत आहे. त्यामुळे या रुग्णालयांचे प्रमुख रुग्णालये स्वच्छ करण्याच्या तयारीला लागले आहेत. यापूर्वी राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या भेटी दरम्यान तेथील वसतीगृहाची अवस्था पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिष्ठात्यालाच निलंबित केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा धाक घेऊन पालिका रुग्णालयांमध्ये व्यापक स्वच्छता मोहिम सुरु करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांचा हा दौरा खरच रुग्णालयांमधील फक्त त्रुटी शोधणारा असणार की त्या त्रुटी राजकारण न करता दूर करणारा असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ठाकरे कुटुंबियांकडून मुंबई महानगरपालिकेची सत्ता काबीज करण्याच्या तयारीला शिंदे गट लागला असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केईएम, सायन, नायर, कूपर तसेच नायर हॉस्पिटल आणि डेंटल कॉलेजला भेट देण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रुग्णालयांतील स्वच्छता आणि सुशोभीकरणावर भर दिला जात आहे. सर्व रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना रुग्णालयातील स्थिती अद्ययावत ठेवण्याचे निर्देश दिले गेले असून रुग्णालय आवारातील भंगार, मोडतोड आणि नको त्या गोष्टी हलविण्यासाठी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना वळवण्यात आले असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

दरम्यान, वरील रुग्णालयांची नावे ही पालिकेची प्रमुख रुग्णालयांपैकी असले तरी देखील उपनगरीय आणि तत्सम रुग्णालयांमध्ये देखील स्वच्छता मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेतर रुग्णालयातील मजले स्वच्छ करण्यात येत आहेत. पंखे, खिडक्या, पायऱ्या आणि इतर उपकरणीय भागांची देखभाल केली जात आहे. प्रत्येक महिन्याला अधिकाऱ्यांनी रुग्णालयीन भेट देणे आवश्यक असताना तसे केले जात नसल्याची एका अधिकाऱ्याकडून ऐकायला मिळाली. या स्वच्छता मोहिम कामातून तुर्तास ४०० किलो वजनाचे नको असलेले सामान बाहेर काढण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here