By Sachin Unhalekar
Twitter: @Rav2Sachin
मुंबई: येत्या सहा ते आठ महिन्यांत पालिकेच्या सुरक्षा रक्षक विभागात सहाय्यक सुरक्षा रक्षक अधिकारी आणि सुरक्षा रक्षक पदांची भरती होणार आहे. यंदाच्या भरती प्रक्रियेत शैक्षणिक सोबत शारीरिक क्षमतेच्या अटी शर्तींमध्ये बदल होणार आहे. तसे परिपत्रक ही प्रमुख कर्मचारी अधिकारी विभागात आला असून यावर सध्या काम सुरु आहे. यावेळीच्या भरती प्रक्रियेत पहिल्यांदाच लेखी परिक्षा घेण्यास सुरुवात होणार आहे.
मुंबई महापालिकेच्या सुरक्षा रक्षक विभागात सुरक्षा रक्षक आणि अधिकारी पदाच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्यात पुढील वर्षी २०२४ मध्ये अनेकजण निवृत्त होणार असल्याने कमी मनुष्यबळात काम कसे होणार ?, असा प्रश्न उपस्थित झाल्याने त्वरित सुरक्षा रक्षक विभागात भरती प्रक्रिया करण्यासाठी पाऊले उचलण्यात आली आहे. मात्र यंदा होणाऱ्या भरती प्रक्रियेत अटी आणि शर्तींमध्ये बदल करण्याचे परिपत्रक जारी झाल्याने सध्या या परिपत्रकानुसार बदल करण्याचे काम प्रमुख कर्मचारी अधिकारी विभागात सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी सुरक्षा रक्षक पदासाठी १२ परीक्षेत उत्तीर्ण आवश्यक आहे. यामध्ये जातीनिहाय पदांच्या जागांसाठी १२ वी परीक्षेत ४५ टक्के आवश्यक आहे तर खुला गटांच्या जागांसाठी ५० टक्के लागणार आहे. यापूर्वी इयत्ता बारावी ऐवजी दहावी परीक्षेत उत्तीर्ण होण्याची अट होती.
यंदापासून पहिल्यांदा सुरक्षा रक्षक पदांच्या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा घेण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे मैदानी सोबत लेखी परीक्षा ही होणार आहे. लेखी परीक्षा ही १२० गुणांची असणार आहे. तर मैदानी परीक्षा ही ८० गुणांची असणार आहे. यामध्ये सुरुवातीला लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेत जे उमेदवार ५४ गुणांनी उत्तीर्ण होतील ते पुढे मैदानी परीक्षेकरिता पात्र ठरणार आहे. मैदानी परीक्षेत ३६ गुण मिळणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने लेखी आणि मैदानी परीक्षेत एकूण ९० गुण मिळणे आवश्यक आहे.
यंदाच्या भरतीत प्रथमच महिला उमेदवारांसाठी उंचीची अट १६० से.मी. वरुन शिथिल करत १५७ से.मी. करण्यात येणार आहे. तर पुरुष उमेदवारांची उंची १६५ से.मी. असणार आहे.
यासोबतच सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदांच्या भरती प्रक्रियेत पहिल्या प्रयत्नात पंधरावीची परीक्षा कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण आवश्यक आहे.
दरम्यान, नव्याने होत असलेल्या अटी आणि शर्तींमधील बदल संदर्भात प्रमुख कर्मचारी अधिकारी विभागात जोमाने काम सुरु असून लवकरच हे काम पूर्ण होऊन भरती प्रक्रियेचा प्रस्ताव पारित होईल. त्यामुळे येत्या सहा ते आठ महिन्यात सुरक्षा रक्षक आणि सहाय्यक सुरक्षा रक्षक अधिकारी पदांची भरती होईल, असा विश्वास पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.