मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे चंदीगडच्या महापौरांकडून कौतूक

@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन (solid waste management) खात्याद्वारे राबविण्यात येत असलेले विविध प्रकल्प हे चंदीगडसारख्या (Chandigad) शहरांना निश्चितच मार्गदर्शक व प्रेरणादायी आहेत, असे कौतुकोद्गार चंदीगडच्या महापौर सर्बजीत कौर यांनी काढले. तसेच, मुंबईच्या धर्तीवर चंदीगडमध्येसुद्धा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येईल, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

त्यांनी गुरुवारी मुंबई महापालिकेच्या (BMC) घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या विविध प्रकल्पांना भेट दिली व पाहणी करून सखोल माहिती जाणून घेतली. त्यानंतर महापालिका मुख्यालयात पालिका आयुक्त डॉ. इक्बाल चहल (BMC Commissioner IS Chahal) यांच्याशी संवाद साधताना त्यांनी वरीलप्रमाणे निर्धार व्यक्त केला.

पालिका आयुक्त डॉ. इक्बाल चहल यांनी चंदिगड महापालिकेच्या महापौर, आयुक्त आणि मान्यवरांना मुंबई महापालिकेच्या कामकाजाची माहिती दिली. तसेच, मुंबई महापालिकेची प्रशासकीय कार्यपद्धती, मुंबई महापालिका अधिनियमाची वैशिष्ट्ये, व्यवस्थापन, मनुष्यबळ, विविध कामांचा आवाका आणि मुंबईकरांना पालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधांची माहिती देखील आयुक्त यांनी मान्यवरांना दिली.

तसेच, मुंबईत पालिकेची पाणी पुरवठा यंत्रणा, सागरी किनारा रस्ता, उद्याने, वैद्यकीय यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, कोविड काळात महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अविरतपणे व तत्परतेने केलेली कामे यांचीही माहिती त्यांनी मान्यवरांना यावेळी दिली.

याप्रसंगी, चंदीगड महापालिकेच्या आयुक्त अनिंदिता मित्रा यांनी, मुंबई महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन ज्या पद्धतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केले जाते; त्याच धर्तीवर आता चंदीगड महानगरपालिकेच्या स्तरावर देखील अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारित घनकचरा व्यवस्थापन लवकरच साध्य केले जाणार असल्याचे सांगितले.

या पाहणी दौऱ्यादरम्यान चंदीगड महापालिकेच्या महापौर सर्बजीत कौर, अनुप गुप्ता, चंदीगडच्या महापालिका आयुक्त अनिंदता मित्रा, प्रमुख अभियंता एन. पी. शर्मा हे उपस्थित होते. तर त्यांच्यासमवेत मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या उपायुक्त डाॅ. संगीता हसनाळे, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प) मिनेष पिंपळे, विशेष कार्य अधिकारी सुनील सरदार, अभियंता शैलेन्द्र काळे व अवधूत पुजारी यांनी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या विविध प्रकल्पांची व कामांची माहिती मान्यवरांना यावेळी दिली.

या पाहणी दौऱ्याची सुरुवात कांजूरमार्ग क्षेपणभूमी (Dumping ground) येथून झाली. याठिकाणी कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प, कचऱ्यापासून खत निर्मिती, कचरा व्यवस्थापनात अत्याधुनिक व संगणकीय तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर इत्यादी बाबींची माहिती मान्यवरांनी घेतली. त्यानंतर मान्यवरांनी मुलुंड येथील क्षेपणभूमी येथे प्रगतीपथावर असलेल्या ‘बायोमायनिंग’ प्रकल्पास भेट देऊन तेथील कामांची माहिती घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here