Twitter : @maharashtracity
मुंबई: डेंगी, मलेरिया (हिवताप) या सारख्या आजारांशी मुकाबला करण्यासाठी व त्यांना प्रतिबंध करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्व स्तरावर प्रयत्न करीत असते. बृहन्मुंबई महानगरपालिका नियमितपणे सर्व स्तरीय कार्यवाही करतानाच जनजागृती पर मोहीम देखील नियमितपणे राबवत असते. मात्र, अनेकदा डेंगी-मलेरिया यांसारख्या आजारांचे निदान लवकर न झाल्याने हे आजार बळावतात आणि प्रसंगी प्राणघातक ठरू शकतात. हीच बाब लक्षात घेऊन कोविड विरोधातील लढ्याच्या धर्तीवर डेंग्यू मलेरिया विरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
या अंतर्गत डेंगी, मलेरियाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांचा मोहीम स्वरूपात शोध घेण्याचे व लक्षणे आढळून आल्यास वैद्यकीय चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या चाचणीमध्ये डेंगी, मलेरियाचे निदान झालेल्या रुग्णांनी वेळेवर औषध घ्यावे व आवश्यक ती काळजी घ्यावी, यासाठी ‘टेलिफोनिक फॉलोअप’ घेता यावा, याकरिता सर्व २४ विभागांमध्ये कार्यरत असलेल्या नियंत्रण कक्षांमार्फत कार्यवाही करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत,
कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) दक्षा शहा यांनी खालील मुद्यांनुसार माहिती दिली.
- सर्व खासगी प्रयोगशाळा व रुग्णालये यांनी त्यांच्याकडील सर्व डेंगी व मलेरिया रुग्णांची माहिती महानगरपालिकेला देणे बंधनकारक असेल, असे परिपत्रक कार्यकारी आरोग्य अधिकारी यांमार्फत काढण्यात आले आहे.
- कोविड काळात विभाग स्तरावर कार्यान्वित करण्यात आलेल्या ‘कोविड वॉर रूम’ यांचा उपयोग डेंग्यू, मलेरिया व पावसाळी आजार यांच्या प्रतिबंधासाठी करण्याचे निर्देश. प्रत्येक विभागीय ‘वॉर रूम मध्ये एक डॉक्टर, एक समन्वयक आणि एक डेटा एन्ट्री ऑपरेटर दोन सत्रांमध्ये काम करतील.
- दिनांक १ जुलै २०२३ पासून तात्काळ लागू करण्यात आलेल्या सुधारित कार्यपद्धती अंतर्गत कोविडच्या धर्तीवर घरोघर जाऊन शोधमोहीम घेण्याचे निर्देश, आरोग्य केंद्रामार्फात केलेल्या शोध मोहिमेअंतर्गत डेंगी किंवा मलेरियाचा रुग्ण आढळून आलेल्या कुटुंबासह जवळपासच्या परिसरातील सुमारे २५० घरांमधील नागरिकांचे ‘रॅपिंड’ सर्वेक्षण करून ताप सदृश्य रुग्णांचे रक्त नमुने संकलित करून त्याच दिवशी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. ताप सदृश्य रुग्णांना नजीकच्या मनापा रुग्णालयात संदर्भित केले जात आहे .
- रॅपिड सर्वेक्षण करताना वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खाते, कीटक नियंत्रण अधिकारी, कीटक नियंत्रण विभाग आणि मलेरिया संनिरीक्षण विभाग यांनी संयुक्तपणे मोहीम राबविण्याचे निर्देश, जेणेकरून एकाच वेळी रुग्ण शोधणे, रुग्णांवर उपचार करणे आणि डासांची उत्पत्ती स्थळे शोधून ती नष्ट करणे यासारखी कार्यवाही एकत्रितपणे करणे शक्य होईल. तसेच अतिजोखमीचे महापालिका विभाग शोधणे व कार्यवाही करणे.
- नागरिकांना डासांची उत्पत्ती स्थळे कशी शोधावी व ती कशी नष्ट करावी याबाबत संयुक्त मोहिमेदरम्यान व्यापक जनजागृती व प्रचार करणे. तसेच खासगी इमारती, गृहनिर्माण संस्था या ठिकाणी एएलएम बरोबर बैठका आयोजित करणे. बांधकामाच्या ठिकाणी बैठका आयोजित करणे व जनजागृती करणे. तसेच कार्यालयीन ठिकाणी बैठका आयोजित करणे.
- सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन •
- 1. नागरिकांनी आपल्या घरामध्ये, घराच्या आजूबाजूला व सोसायटीच्या परिसरात कुठेही साचलेले पाणी असणार नाही याची दक्षता घ्यावी. साचलेल्या पाण्यातच डासांची मादी अंडी घालते व डासांची उत्पत्ती स्थळे तयार होतात ही बाब लक्षात घेऊन साचलेले पाणी आढळून आले असते तात्काळ नष्ट करण्याचे नागरिकांना आवाहन
- 2. टायर, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिकच्या बाटल्या व बाटल्यांची झाकणे, झाडांच्या कुंड्या व त्या कुंड्या खालील ताटल्या, फ्रीज च्या खालील डिफ्रॉस्ट ट्रे यात साचलेले पाणी असणार नाही याची दररोज पाहणी करावी व दक्षता घ्यावी.
- 3. फेंगशुई, मनी प्लांट यासारख्या शोभेच्या रोपट्यांचे पाणी नियमितपणे बदलण्याचे आवाहन
- 4. कोविड विरोधातील लढ्याचे अनुभव लक्षात घेऊन करण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणामुळे रुग्णांची संख्या वाढू शकेल. मात्र ही वाढलेली संख्या बघून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. वस्तूतः या मोहिमेमुळे डेंगी मलेरिया विषयक लवकर निदान झाल्याने आणि लवकर औषध उपचार सुरू झाल्याने रुग्णांचे प्राण वाचविणे आणि ते लवकर बरे होण्यास निश्चितच बळ मिळणार आहे, असा विश्वास कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) दक्षा शहा यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.
- कीटकजन्य आजार (मलेरिया आणि डेंगी) प्रतिबंधासाठी सल्ला
- हे करावे
- दिवसा आणि रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिकारक (Mosquito Repellent ) औषधांचा वापर करावा.
- कुलर आणि लहान कंटेनरमधून नियमितपणे पाणी काढा, सर्व जलस्त्रोत पूर्णपणे झाकलेले आहेत याची खात्री करा.
- डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे काढून टाका, यासह:
- बाल्कनीत प्लॅट, एसी ट्रे, मातीची भांडी, फ्रीज ट्रे.
- धुतलेली भांडी ठेवणारे स्वयंपाकघरातील रॅक.
- खचाखच भरलेले स्वयंपाकघर आणि बाथरूमचे नाले.
- कूलर.
- बाथरूम आणि टाक्यांमध्ये गळती .
- उघड्या बादल्या किंवा पाण्याचे डबे जे नियमितपणे वापरले जात नाहीत.
- शोभिवंत फुलांच्या फुलदाण्या किंवा पाण्यासह शोपीस.
- बोन्साई वनस्पती आणि इनडोअर वनस्पती.
- डासांपासून बचाव करण्यासाठी पूर्ण बाजूचे कपडे घाला.
- हे करू नये
- जुने टायर, पाण्याच्या टाक्या, नळ्या, प्लास्टिक कंटेनर यांसारख्या वस्तू जमा करणे टाळा, कारण त्यातून डासांची उत्पत्ती होते.
- डासांची पैदास होऊ नये म्हणून पाण्याचे डबे बंद ठेवा.
- जलजन्य आजारांसाठी (गॅस्ट्रो, हिपॅटायटीस, टायफॉईड) खबरदारीचे उपाय:
- गॅस्ट्रोपासून बचाव करण्यासाठी रस्त्यावरच्या उघड्या पदार्थाचे सेवन करणे टाळा.
- खाण्यापूर्वी स्वच्छ हात धुवा किंवा सॅनिटायझरचा वापरा करा .
- पाणी उकळून प्यावे .
- एच 1 एन 1 च्या प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना
- गर्दीची ठिकाणे टाळा.
- शिंकताना किंवा खोकताना रुमालाचा योग्य वापर करावा.
- वारंवार साबणाने हात धुणे.
- डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळा.
- तीव्र ताप, श्वास घेण्यास त्रास किंवा त्वचा / ओठ निळे पडणे अशी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ मनपाच्या आरोग्य सुविधा केंद्रामध्ये जाऊन डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या.
- उपचारांना उशीर केल्याने गुंतागुंत होऊ शकते आणि मृत्यूचा धोका वाढू शकतो.