चार वॉर्डात तपासणीला सुरुवात
Twitter: @maharashtracity
मुंबई: असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई महापालिकेने त्यांच्या प्रमुख रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये एनसीडी कॉर्नर (NCD corner) म्हणजे असंसर्गजन्य आजारांची तपासणी सुरु केली आहे. या एनसीडी कॉर्नरमध्ये मधुमेह (diabetes) आणि उच्च रक्तदाब (High blood pressure) तपासणी केली जाते. ३० वर्षांवरील सर्व व्यक्तींना या दोन्ही चाचण्या करणे बंधनकारक केले असून आता यापुढे जाऊन पालिकेने मधुमेहासाठीच्या रुग्णांसाठी रेटिनोपॅथी (retinopathy) म्हणजे डोळ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या एकूण चार वॉर्डात या तपासण्या सुरु करण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
दरम्यान, पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मधुमेहाच्या सर्व रुग्णांची रेटीनोपॅथी तपासणी केली जात आहे. पहिल्यांदा चार वॉर्डात ही तपासणी सुरु केली गेली आहे. याविषयी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले की, एनसीडी कॉर्नरमध्ये येणाऱ्या ज्यांना मधुमेहाचे निदान होत आहे, त्या सर्वांची डोळ्यांची ही तपासणी केली जात आहे. रेटीनोपॅथीचे स्क्रिनिंग सुरु केले जाणार आहे. यासाठी आम्हाला काही उपकरणे लागणार आहेत. तसेच, आरोग्य सेवकांना या संदर्भात प्रशिक्षण दिले जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी आणखी ३ महिने लागणार आहेत.
मधुमेहाचा सर्वाधिक त्रास शरीरातील इतर अवयवांसह डोळ्यांवरही होतो. त्यामुळे, मधुमेहग्रस्तांची रेटीनोपॅथी तपासणी करणे आवश्यक असते. मधुमेह वाढला असल्यास अनेकदा दृष्टीदोष उद्भवू शकतो. कायमस्वरुपी दृष्टी जाण्याची ही भीती असते. म्हणूनच पालिकेने मधुमेही रुग्णांची रेटीनोपॅथी करण्याचा निर्णय घेतला आहे. एनसीडी कॉर्नरमध्ये मधुमेहाचे निदान झालेल्या प्रत्येकाची रेटीनोपॅथी केली जात आहे. नुकतीच मुंबईतील चार वॉर्डमध्ये अशा प्रकारे तपासणी सुरु झाल्याचे पालिकेच्या संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले.