@maharashtracity
विविध कामांच्या अंमलबजावणीत पर्यावरणीय मापदंड राखण्यासाठी होणार मदत
मुंबई: सध्या पवई तलावाचा (Powar Lake) विषय खूपच गाजतो आहे. या तलावातील रासायनिक सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण व सायकल ट्रॅकच्या कामांवरून पालिकेतील पहारेकरी भाजपने (BJP) खूपच रान उठवले. तर दुसरीकडे पर्यावरण प्रेमींनीही गाजावाजा करीत आक्षेप घेतल्याने अखेर पालिकेने तलावाच्या पुनरुज्जीवन व पर्यावरणा मूल्यमापन करण्यासाठी एक खासगी संस्था नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेमार्फत (BMC) पवई तलावाच्या भौतिक व नैसर्गिक वातावरणाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामांची अंमलबजावणी करताना पर्यावरणीय मापदंड राखले जावेत, यादृष्टिने महापालिकेतर्फे पवई तलाव पर्यावरणीय मूल्यमापन संस्था नियुक्त केली जाणार आहे.
पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या पर्यावरणीय पैलूंवर देखरेख करण्यासाठी आणि पवई तलावाच्या काठाची जैवविविधता (biodiversity) वाढविण्यासाठी तज्ज्ञांची एक देखरेख समिती यापूर्वीच स्थापन करण्यात आली आहे. मगरी व जलचर यांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांचे अभ्यासक तज्ञ, वन्यजीवशास्त्रज्ञ केदार भिडे यांची देखील त्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
तलावातील जलचर विषयक परिस्थिती सुधारणे, पवई तलावातील नैसर्गिक पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी उपाययोजना अंमलात आणणे, तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारणे इत्यादीबाबत मार्गदर्शन आणि शिफारशी करण्यासाठी श्री. भिडे यांची नियुक्ती केलेली आहे.
पालिकेने पवई तलावाचे पर्यावरणीय मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात तज्ज्ञ सल्लागार समितीने सुचविलेल्या विविध संदर्भित अटींचा समावेश असेल. पवई तलाव संदर्भात विविध संस्थांनी यापूर्वी अभ्यास करुन बनविलेले अहवाल आणि संशोधन संकलित करण्यासाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ सल्लागार समितीला सहाय्य करणे.
तसेच, पवई तलाव आणि परिसराशी संबंधित पर्यावरणीय घटकांचे नमुने घेणे. तलावाच्या तळाशी असलेली जैवस्थिती, सरपटणारे प्राणी व जलचर आणि इतर जैवविविधता यांची आधाररेषा निश्चित करणे. त्याचप्रमाणें, मानवरहित विमान प्रणालीद्वारे तलाव आणि त्याच्या सभोवतालचे सीमांकन (मॅपिंग) ठरवणे, उच्च दर्जाच्या छायाचित्र भूमिती प्रतिमा तयार करणे. पवई तलावाच्या सद्यस्थितीतील पर्यावरणीय गुणवत्तेचे मूल्यमापन करणे आणि सरोवरशास्त्राच्या नजरेतून बाबी निश्चिती करणे.
उपलब्ध माहितीआधारे पवई तलावाची सरोवरशास्त्रीय पद्धतीने माहिती तयार करणे. तसेच, नवीन अभ्यास करुन ती अद्ययावत करणे. जलवैज्ञानिकदृष्ट्या तलावावर झालेल्या परिणामांचा अभ्यास करणे. तलाव संरक्षण आणि पुनरुज्जीवन कामांसाठी संशोधन सहाय्य प्रदान करणे. तलाव आणि परिसरात मानव आणि प्राणी दरम्यान संघर्ष रोखण्यासाठी योजना तयार करणे.
तलाव परिसरात पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यावरणपूरक संकल्पना सुचविणे आणि तलावातील मगरी व इतर प्राण्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना सुचविणे. स्थलीय आणि जलीय जैवविविधतेचे मूल्यांकन करणे. तलाव पुनरुज्जीवनासाठीचे पर्याय तयार करणे. त्याचा तलाव व परिसरातील पर्यावरणीय गुणधर्मांवर होणारा परिणाम अभ्यासणे व बाष्पीभवनाच्या नुकसानाचे मूल्यमापन करणे आणि इतर जलस्रोतांशी त्याचा संबंध पडताळून पाहणे. मुंबई महापालिका किंवा पवई तलाव सल्लागार समिती यांनी सुचविलेली इतर कोणतेही कामे इत्यादी जबाबदारी या संस्थेकडे सोपविण्यात येईल.