पालिकेच्या पाहणीत उघड
पालिका बजावणार कारवाईसाठी नोटीस
@maharashtracity
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व शिवसेना (Shiv Sena) यांच्याशी पंगा घेणारे खा. नवनीत राणा (MP Navneet Rana) व आ. रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्या खार येथील घरात नियमबाह्य बांधकाम झाल्याचे पालिकेच्या पथकाने केलेल्या पाहणीत उघडकीस आले आहे. त्यामुळे पालिका (BMC) आता राणा दाम्पत्यांना पुन्हा नोटीस बजावणार आहे. यासंदर्भातील माहिती पालिकेच्या एच/पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली आहे.
खार येथील १४ व्या रस्त्यावरील ‘लाव्ही’ इमारतीत राणा दाम्पत्याचे ८ व्या मजल्यावरील ४१२ क्रमांकाचे घर असून तेथे नियमबाह्य बांधकाम (illegal construction) झाल्याने पालिकेच्या पथकाने हे बांधकाम तपासण्यासाठी राणा दाम्पत्याना मुंबई महापालिकेने ४८८ अन्वये नोटीस बजावली होती.
मात्र, पालिका पथक दोन दिवस राणा यांच्या घरी तपासणीसाठी गेले असता ते घरात नसल्याने पथकाला रिकाम्या हाताने घरी परतावे लागले होते.
अखेर राणा दाम्पत्य खार येथील घरी आल्याची माहिती मिळाल्यानंतर व त्यांनी दिल्ली गाठण्यापूर्वीच पालिकेच्या एच/पश्चिम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारीच राणा यांच्या राहत्या घरी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी, राणा यांच्या घरात नियमबाह्यपणे वाढीव बांधकाम झाल्याचे संबंधीत अधिकाऱ्यांना आढळून आले. यावेळी, अधिकाऱ्यांनी या घरातील नियमबाह्य बांधकामाचे फोटो घेतले. त्यामुळे आता राणा दाम्पत्यांना पुन्हा एकदा पालिकेकडून नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त विसपुते यांनी सांगितले.