विकास कामांसाठी ६५० कोटीची फेरफार
@maharashtracity
मुंबई
मुंबई महापालिकेचा सन २०२२ – २३ या आर्थिक वर्षासाठी सादर अंदाजित अर्थसंकल्पात ६५० कोटींचा फेरफार केल्यानंतर त्यास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मात्र तत्पूर्वी, अर्थसंकल्पात ६५० कोटींचा अनावश्यक फेरफार केल्याचे कारण देत पालिकेतील भाजप गटनेते प्रभाकर शिंदे व त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.
या अर्थसंकल्पाला स्थायी समितीकडून मंजुरी मिळाल्यामुळे आता लवकरच हा अर्थसंकल्प पालिका सभागृहात चर्चेकरिता व मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.
या अर्थसंकल्पातून पालिका स्थायी समितीला तब्बल ६५० कोटी रुपयांचा निधी विकास कामांसाठी मिळाला आहे. त्याचे प्रचलित नियमानुसार वाटप केले जाईल, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.
पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, पालिकेच्या इतिहासातील सर्वात जास्त फुगीर आकडेवारीचा म्हणजे ४५ हजार ९४९ कोटी २१ लाख रुपयांचा अर्थसंकल्प ३ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीला मंजुरीसाठी सादर केला होता. मागील अर्थसंकल्पाच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प हा ६ हजार ९१० कोटी ३८ लाख रुपयांनी मोठा आहे.
या अर्थसंकल्पात, अनधिकृत बांधकामावर मालमत्ता कराच्या दोनपट इतकी दंड आकारणी करण्याबरोबर कचऱ्यावर वापरकर्ता शुल्क आकारण्यात येणार आहे. कोस्टल रोड, दर्जेदार आरोग्य सेवा आणि रस्ते, पाणी पुरवठा प्रकल्प, घनकचरा, मलनिसारण यावर भरीव तरतूद, असलेला अर्थसंकल्प आहे. स्थायी समितीत या अर्थसंकल्पावर तब्बल ११ तास चर्चा झाली. स्थायी समितीच्या २६ पैकी १२ सदस्यांची अर्थसंकल्पावर भाषणे झाली. भांडवली आणि महसूली अर्थसंकल्पात बदल सुचवून विकास कामांसाठी ६५० कोटी रुपयांची तरतूद स्थायी समितीने केली आहे.
“पालिकेच्या निधीचे वाटप करताना स्थायी समितीकडून कोणावरही अन्याय होणार नाही. राजकीय पक्षांना त्यांच्या नगरसेवकांच्या संख्येच्या प्रमाणात निधीचे वाटप करण्याचा निर्णय येत्या काळात घेतला जाईल. प्रत्येक वॉर्डसाठी निधी दिला जाणार आहे. यासाठी नगरसेवकांनी आपल्या कामांबाबत पत्र देणे आवश्यक आहे. जे नगरसेवक पत्र देतील त्यांच्या कामासाठी निधी राखीव ठेवला जाईल. आम्ही काही चांगले निर्णय घेतले, निधीची तरतूद केली तरी भाजप त्यावर आक्षेप घेऊन त्यास विरोध करतो. विरोध हा भाजपच्या नसानसात भिनलेला आहे. भाजप स्वतः काही चांगल काम करीत नाही आणि आम्ही काही चांगले केले तर त्याला विरोध करायचा, हेच त्यांचे काम आहे. ते विरोध करीत राहतील आणि मुंबईसाठी आम्ही चांगली विकासकामे करीत राहू.”
- यशवंत जाधव,अध्यक्ष,स्थायी समिती
भाजपचा सभात्याग
महापालिका सीमा निश्चित झालेल्या नसतानाही कोट्य़वधी रुपयांची कामे केली जात आहेत. हा अर्थसंकल्प नियमबाह्य, फसवा व दिशाभूल करणारा आहे. सत्ताधा-यांसाठी टक्केवारीचा, कंत्राटधार्जिणा असल्याचे सांगत भाजप गटनेते प्रभाकर शिंदे व भाजपच्या इतर नगरसेवकांनी पालिका, सत्ताधारी शिवसेनेचा निषेध व्यक्त करीत सभात्याग केला.