@maharashtracity

प्रस्ताव मंजुरीसाठी सादर

पावसाच्या पाण्याचा निचरा जलद होण्यासाठी अतिरिक्त यंत्रणेचा केला वापर

११.२३ कोटींचा खर्च गेला १२.२३ कोटींवर

प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीला सादर

मुंबई: राज्याची सत्ता हाती असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या वांद्रे येथील मातोश्री (Matoshree) बंगल्यासह संपूर्ण कलानगरला पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यापासून वाचविण्यासाठी पालिकेने कंत्राटदाराकडून गेल्या दोन वर्षात जादा यंत्रणा वापरली आहे. मात्र त्यासाठी पालिकेने कंत्राटदाराला (contractor) एक कोटी रुपये जादा मोजल्याचे प्रकरण प्रस्ताव रूपाने पालिकेत स्थायी समितीत आले आहे.

यासंदर्भातील झालेल्या कामाचा व त्यातील वाढीव खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पालिकेने सादर केला आहे.

मुंबईत अतिवृष्टी व समुद्राला त्याचवेळी मोठी भरती असल्यास कुर्ला, घाटकोपर, सायन, किंग्ज सर्कल, सखल भागात पावसाचे पाणी कमी – अधिक प्रमाणात साचते. या साचणाऱ्या पाण्याचा निचरा जलदगतीने करण्यासाठी पालिकेने शेकडो कोटी रुपये खर्चून मुंबईत सहा ठिकाणी मोठ्या क्षमतेचे पंपिंग स्टेशन उभारले.

वांद्रे कलानगर (Kala Nagar, Bandra)
येथे पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा समुद्रात, मिठी नदी व वाकोला नदी पात्रात पातमुखांद्वारे केला जातो. मात्र, नदीच्या पाण्याचा प्रवाह उलट दिशेने होऊ नये यासाठी कलानगर वांद्रे (पूर्व) भागातील पर्जन्य जलवाहिनीमध्ये प्रतिबंधित केला जातो.

समुद्राला भरती येण्यापूर्वी पातमुखांचे गेट्स बंद करण्यात येतात. त्यानंतर पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये साचलेल्या पावसाळी पाण्याचा उच्च क्षमतेच्या पंपाद्वारे उपसा केला जातो. त्यामुळे पावसाळी पाण्याचा निचरा जलद गतीने होतो.

पालिकेने कलानगर परिसरात पेनस्टॉक प्रकारच्या गेट्सचे फॅब्रिकेशन, पुरवठा, स्थापना व चाचणी करून कार्यान्वित करणे, प्रति ताशी १ हजार घनमीटर एवढ्या क्षमतेने पाणी उपसा करण्यासाठी भाडे तत्वावर मोठया क्षमतेचे पंप पुरविणे आणि २०२०, २०२१ या दोन वर्षात परिरक्षण करणे याबाबतचे कंत्राटकाम मे. महाबळ इन्फ्रा इंजिनिअर्स या कंत्राटदाराला दिले होते.

मात्र, जुलै २०२० मध्ये समुद्र भरती वेळी जोरदार पाऊस पडल्याने सायन धारावी पुलाजवळील जंक्शन येथे आणि एमएमआरडीए (MMRDA) गार्डन येथे साचलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी केलेली व्यवस्था अपुरी पडल्याने त्या ठिकाणी अतिरिक्त प्रति ताशी १ हजार घनमीटर एवढया क्षमतेने पाणी उपसा करण्यासाठी भाडे तत्वावर मोठया क्षमतेचे दोन पंप बसविण्यात आले होते.

या कामाचा खर्च ११ कोटी २३ लाख रुपयांवरून वाढून १२ कोटी २३ लाख रुपयांवर गेला. परिणामी या कामाचा वाढीव १ कोटींचा खर्च कंत्राटदाराला देण्यासाठी याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आलेला आहे. या प्रस्तावाला पालिकेतील भाजपच्या नगरसेवकांकडून (BJP corporators) विरोध होण्याची आणि त्यावर खरमरीत चर्चा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here