शाडू मातीच्या गणेशमूर्ती साकारण्यासाठी पालिकेकडून कार्यशाळा

३६० विद्यार्थ्यांपैकी ७ विद्यार्थ्यांची उत्कृष्ट बाल गणेशमूर्तिकार म्हणून निवड

@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेने गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभूमीवर पालिका शाळेत पर्यावरणपूरक शाडू मातीपासून ‘श्रीगणेश मूर्ती’ बनविण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यामध्ये विविध शाळांमधून सहभागी ३६० विद्यार्थ्यांपैकी ७ विद्यार्थ्यांची उत्कृष्ट बाल गणेशमूर्तिकार (Ganesh idols) म्हणून निवड करण्यात आली आहे. या ७ विद्यार्थ्यांचा पालिका प्रशासनाकडून लवकरच समारंभपूर्वक गौरव करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या (BMC) शिक्षण विभागांतर्गत संगीत व कला अकादमी कला विभागाच्यावतीने दरवर्षी श्री गणेशमूर्ती मातीकाम विद्यार्थी कार्यशाळा आयोजित करण्यात येते. मात्र, कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावामुळे (covid-19 pandemic) कार्यशाळा आयोजनामध्ये खंड पडला होता. यंदापासून हा उपक्रम पुन्हा सुरु करण्यात आला आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. यंदा २५ ऑगस्ट रोजी श्री गणेशमूर्ती मातीकाम कार्यशाळा महापालिका क्षेत्रात पश्चिम उपनगरात कांदिवली (पश्चिम), अंधेरी (पूर्व), पूर्व उपनगरात घाटकोपर, कुर्ला तर शहर विभागात फोर्ट व लोअर परळ आदी ६ ठिकाणी केंद्रस्तरावर आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये पालिकेच्या विविध शाळांमधून एकूण ३६० विद्यार्थी सहभागी झाले. या कार्यशाळांमध्ये मिळून एकूण ३६० विद्यार्थी सहभागी झाले. त्यातून निवडक प्रत्येकी पाच याप्रमाणे एकूण ३० विद्यार्थ्यांची मध्यवर्ती स्तर स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

दिनांक २६ ऑगस्ट रोजी मध्यवर्ती कार्यशाळेचे आयोजन लोअर परळ येथे ना. म. जोशी महानगरपालिका शाळेत (BMC schools) करण्यात आले. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून आपल्या संकल्पनेतून विविध रूपात श्री गणेशाचे रूप साकारले. पर्यावरण संतुलित व समृद्ध ठेवण्यासह जल प्रदूषण (water pollution) रोखण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी या कार्यशाळेच्या माध्यमातून महापालिका विद्यार्थी एकप्रकारे पर्यावरण दूत बनून कलागुण सादर करत असल्याच्या भावना विविध मान्यवरांनी या कार्यशाळेप्रसंगी व्यक्त केल्या.

यावेळी, सुप्रसिद्ध मूर्तिकार उदय डावल यांनी,
उत्कृष्ट व सुंदर अशी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्ती साकारणाऱ्या ७ विद्यार्थ्यांची बाल मूर्तीकार म्हणून निवड केली. या विजेत्या बाल मूर्तिकारांमध्ये प्रथम पारितोषिक – अक्षरा अजय वर्मा (वरळी सी फेस महापालिका इंग्रजी शाळा), द्वितीय पारितोषिक – रागणी चंद्रमोहन जैसवार (धारावी एमपीएस काळा किल्ला महापालिका शाळा), तृतीय पारितोषिक – ज्योती जयराम महतो (न्यू वर्सोवा हिंदी महापालिका शाळा) यांना जाहीर करण्यात आले आहे.

तर उत्तेजनार्थ पारितोषिक विजेत्यांमध्ये वेदांत विलास सोनवणे (वरळी सी फेस महापालिका इंग्रजी शाळा), आर्यन अरुण गिरी (हनुमान नगर महापालिका हिंदी शाळा), रिया राजेश यादव (हनुमान नगर महापालिका हिंदी शाळा), शुभम लालबहादूर बिंद (तिरंदाज व्हिलेज महापालिका हिंदी शाळा) या चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सात बालमूर्तीकारांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करुन लवकरच समारंभपूर्वक गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर केंद्र स्तर व मध्यवर्ती स्तरावर सहभागी झालेल्या बालमूर्तीकारांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आणि राजू तडवी, उपशिक्षणाधिकारी (मध्यवर्ती) श्रीमती सुजाता खरे, उपशिक्षणाधिकारी (शहर) कीर्तीवर्धन किरतकुडवे, अधीक्षिका (शाळा) सायली सुर्वे, प्रशासकीय अधिकारी (शाळा) श्रीमती तनुजा उघाडे व इतर मान्यवरांनी कार्यशाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. कला प्राचार्य दिनकर पवार व‌ कला निदेशक मंजिरी राऊत, भूषण उदगीरकर, योगेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व केंद्रप्रमुख, उपकेंद्रप्रमुख व कलाशिक्षकांनी या कार्यशाळांचे संयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here