विमानतळावर स्क्रिनींग सुरु

@maharashtracity

मुंबई: आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, कॅनडा आदी देशात आढळून येणाऱ्या ‘मंकी पॉक्स विषाणू’ची (monkey pox virus) मुंबईत घुसखोरी होऊ नये यासाठी मुंबई महापालिका आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर पालिका आरोग्य यंत्रणेने स्क्रिनींग (screening of passengers at international airport) सुरु केले आहे.

याबाबतची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात व संपूर्ण देशात गेल्या मार्च २०२० पासून चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोविड विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. सध्या मुंबईत विविध उपाययोजना केल्याने कोविडचा प्रादुर्भाव (covid pandemic) कमी झाला. आता मुंबईत कोविड नियंत्रणात आहे. मात्र, कोविड हद्दपार झालेला नाही. आतापर्यंत कोविडमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. मात्र केंद्र, राज्य व महापालिका यंत्रणेने सतर्कता दाखवून वेळीच वैद्यकीय उपाययोजना केल्याने पालिकेला कोविडवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले.

मंकी पॉक्स आजार, लक्षणे

मंकी पॉक्स हा एक विषाणूजन्य झुनोटिक रोग आहे. जो प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय पर्जन्यवन भागात होतो. या विषाणूचे रुग्ण ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, इटली, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन, यू.के., यू.एस.ए. येथे आढळतो.

मंकी पॉक्स बेनिन, कॅमेरून, मध्य आफ्रिकन रिपब्लिक, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, गॅबन, गहाना (फक्त प्राण्यांमध्ये ओळखले जाते), आयव्हरी कोस्ट, लायबेरिया, नायजेरिया, काँगोचे प्रजासत्ताक, सिएरा लिओन आणि दक्षिण सुदान आदी देशात आढळून येतात.

मंकीपॉक्सची लक्षणे म्हणजे वैद्यकीयदृष्ट्या ताप, पुरळ आणि सुजलेल्या लिम्फ नोड्ससह प्रकट होतो. त्यामुळे अनेक वैद्यकीय गुंतागुंत होऊ शकतात. हा सामान्यतः एक स्वयं-मर्यादित आजार असून ज्याची लक्षणे २ ते ४ आठवडे टिकतात. या विषाणूमुळे मृत्यू दर १ – १० टक्के पर्यंत वाढू शकतो. मंकी पॉक्स हा प्राण्यापासून मानवांमध्ये व मानवाकडून मानवामध्ये प्रसारित होऊ शकतो.

हा विषाणू तुटलेली त्वचा (जरी दिसत नसला तरीही), श्वसनमार्गातून किंवा श्लेष्मल पडद्याद्वारे (डोळे, नाक किंवा तोंड) शरीरात प्रवेश करतो. पुरळ दिसण्याच्या १ – २ दिवस आधी संक्रमित व्यक्ती हा रोग प्रसारित करू शकतो आणि सर्व खरुज गळून पडेपर्यंत संसर्गजन्य राहू शकतो.

कस्तुरबा रुग्णालय सज्ज

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने मुंबईत
मंकी पॉक्स विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी तातडीने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. विशेषकरून मुंबई विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग सुरू करण्यात आली आहे. कस्तुरबा रुग्णालयात संशयित रुग्णांच्या विलगीकरणासाठी स्वतंत्र वॉर्ड, तयार करण्यात आला आहे. वॉर्ड क्रमांक ३० मध्ये २८ खाटा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. परदेशी प्रवाशांचे चाचणी नमुने एनआयव्ही पुणे प्रयोगशाळेत पाठवले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here