अनधिकृत बांधकाम नियमित करण्याबाबतचा राणेंचा अर्ज फेटाळला
१५ दिवसांत कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत
@maharashtracity
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जुहू येथील ‘अधिश’ बंगल्यातील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याबाबत पालिकेकडे सादर केलेला अर्ज पालिकेने फेटाळून लावला आहे. येत्या १५ दिवसात मंत्री राणे यांनी बांधकामाबाबतची योग्य कागदपत्रे सादर न केल्यास त्यांच्या बंगल्यावर पालिकेकडून (BMC) कारवाईचा हातोडा उगारण्यात येणार आहे. त्यामुळे आता राणेंच्या बंगल्यावर पालिकेच्या कारवाईची टांगती तलवार कायम आहे.
दरम्यान, मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी, पालिकेच्या या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मी कधीही सुडाचे राजकारण केलेले नाही. मात्र, माझ्या बंगल्यात कोणतेही अनधिकृत बांधकाम नसताना उगाचच बंगल्यावर कारवाईसाठी सुडाचे राजकारण सत्ताधारी पक्षाकडून केले जात असल्याचे राणे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जुहूच्या अधिश बंगल्यातील बांधकाम नियमिततेचा अर्ज मुंबई महापालिकेने नामंजूर केला आहे. हा अर्ज नामंजूर करताना महापालिकेने काही कारणे दिली आहेत. मंत्री नारायण राणे यांच्याकडून पालिकेला, सीआरझेड २ मध्ये अंतर्गत केलेल्या बांधकामाबद्दल कोणतीही माहिती सादर करण्यात आलेली नाही. तसेच, पालिकेला सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये अंतर्गत वाढीव बांधकामाचाही उल्लेख नाही. अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र, मालमत्ता कर विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, टायटल क्लिअरन्स सर्टिफिकेट यासह वाढीव बांधकाम नियमित करण्यासाठी योग्य कागदपत्रे पुरावे जोडलेले नाहीत, असे महापालिकेने हा अर्ज नामंजूर करताना म्हटले आहे. त्यामुळे मंत्री नारायण राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.
यापूर्वी मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना नोटीस बजावली होती. ही नोटीस नंतर काही कारणास्तव मागे घेण्यात आली होती. मात्र आता पालिकेने बंगल्यातील बांधकाम नियमित करण्याबाबत केलेला अर्ज पालिकेने फेटाळला आहे. त्यामुळे आता पुढील १५ दिवसात मंत्री नारायण राणे सर्व शक्ती पणाला लावून बंगल्यातील बांधकाम वाचणार म्हणजे नियमित करून घेणार की पालिका त्यावर कारवाईचा बडगा उगारणार हे स्पष्ट होणार आहे.