@maharashtracity

बेड्सची कमतरता भासणार नाही -: काकाणी

सध्या १५ हजार बेड तयार

३० हजार बेड्सची तयारी

इतर कोविड सेंटर ७० हजार बेड्स सज्ज

लहान मुलांसाठी १५०० बेड्स,मास्क, व्हेंटीलेटर

मुंबई: मुंबईत कोविडचा नवीन विषाणू ‘ओमायक्रॉंन’चा (Omicron) अद्याप एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र मुंबईत जरी हा विषाणू दाखल झाला तरी त्याला तोंड देण्यासाठी पालिकेने आपली आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

सध्या १५ हजार बेड्स (beds) उपलब्ध असून ३० हजार बेड्सची तयारी सुरू आहे. तसेच, इतर कोविड सेंटरमध्ये ७० हजार बेड्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. एकूण १ लाख बेड्स उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे, लहान मुलांना या विषाणूजी बाधा झाल्यास अशा मुलांसाठी सध्या १५०० बेड्स तयार ठेवण्यात आले आहेत. तसेच, मुलांसाठी मास्क, व्हेंटीलेटरची तयारी करण्यात आली आहे.

यासंदर्भातील माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसात दक्षिण आफ्रिका (South Africa) व युरोपियन देशांत कोविडचा नवीन विषाणू ‘ओमायक्रॉंन’चा प्रादुर्भाव वाढल्याने या देशांत रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका अलर्ट झाली आहे.

मुंबई महापालिकेकडून आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai international airport) संबंधित देशांमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी केली जात आहे. कोविडचे संशयित रुग्ण आढळल्यास त्यांची ‘ओमायक्रॉंन’ चाचणी केली जात आहे.

अद्याप मुंबईत ‘ओमायक्रॉंन’चा एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र पालिका आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी काळजी घेत असून बेड्सची कमतरता भासू देणार नाही, अशी माहिती सुरेश काकाणी यांनी दिली.

चैत्यभूमी परिसरात आरोग्य तपासणी, लसीकरण

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी (Chaityabhoomi, Dadar) येथे दाखल झालेल्या अनुयायांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जात आहे.

महापरिनिर्वाण दिनी आलेल्या भीम अनुयायांचे रेल्वे स्थानकावर स्क्रीनिंग केले जात आहे. त्यांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. कोरोना चाचण्या (corona test) आणि लसीकरण (vaccination) केले जात आहे. मास्क (mask) आणि सॅनिटायझरचे (sanitiser) वाटप केले जात आहे.

कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन आंबेडकरी अनुयायांना केले जात आहे. चैत्यभूमी येथे आलेल्या एक हजार अनुयायांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. गर्दी वाढल्यास लसीकरण केंद्रांची संख्या आणखीन वाढविण्यात येईल, असे काकाणी यांनी सांगितले.

शाळा सुरु कारण्याबाबत आढावा

कोविडचा नवीन विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉंन’चे विषाणू देशातील कर्नाटक (Karnataka) राज्यात व महाराष्ट्रातही (Maharashtra) आढळून आले आहेत. मात्र मुंबईत जरी ‘ओमायक्रॉंन’चे रुग्ण नसले तरी शाळा सुरू (reopening of school) करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतरच शाळा सुरु करायची कि नाहीत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सुरेश काकाणी यांनी संगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here