महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या प्रयत्नांना यश
Twitter : @maharashtracity
मुंबई: महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेकडून मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना परिचारिकांच्या विविध मागण्यांवर निवेदन देण्यात आले होते. यावर अतिरिक्त आयुक्त शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परिचारिकांच्या मागण्या मान्य होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ऍड. प्रकाश देवदास यांनी दिली.
दरम्यान, महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेकडून परिचारिकांना पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी करण्यात आली होती. ही प्रमुख मागणी असून यातून महिन्याकाठी ८ सुट्या परिचाकांना देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. तर इतर मागण्यांमध्ये परिचारिकांची पदे तीन रुग्णांमागे एक परिचारिका असणारे प्रमाण सांभाळण्यासाठी त्यानुसार पदांची भरती करण्यात यावी. शिवाय सीएमओ, डिप्युटी वैद्यकीय अधीक्षक, मुख्य वैद्यकीय अधीक्षक सारखी पदांची पदोन्नती करण्यरात यावी. या मागण्यांवर आंदोलन करण्यात येणार होते. मात्र या मागण्यांवर आता अतिरिक्त आयुक्त डॉ. शिंदे यांच्याशी चर्चा होणार असून जुलै महिन्यात मागण्यांबाबतचे चित्र स्पष्ट होईल. असे एड प्रकाश देवदास यांनी सांगितले.