@maharashtracity
मुंबई: केईएम रुग्णालयात नियमित उपचारांतील अत्यावश्यक औषधे आणि साहित्याचा तुटवडा असल्याच्या तक्रारी शुक्रवारी करण्यात आल्या होत्या. यामुळे रुग्णांना उपचारासाठी लागणारी सर्व औषधे (medicines) आणि नॉन सर्जिकल (non-surgical items) वस्तू बाहेरुन खरेदी कराव्या लागल्याच्या रुग्णांनी तक्रारी केल्या. मात्र हा औषध तुटवडा कृत्रिम असल्याचे एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
या औषध तुटवड्यावर (shortage of medicines) बोलताना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी सांगितले की, यास औषध तुटवडा असे बोलू शकत नाही. तसेच औषध पुरवठा करताना विलंब होत असतो, अशा घटनांना संपूर्ण तुटवडा झाला असे म्हणू शकत नाही. मात्र, आगामी काळात पालिका रुग्णालयात (BMC Hospitals) औषध तुटवडा होऊ नये यासाठी औषध पुरवठाबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. तसेच महिनाभर आधीच औषध पुरवठा करण्यात येईल, असे काकाणी म्हणाले.
कोविड संसर्ग (covid pandemic) कमी झाल्यावर पालिकेच्या रुग्णालयात कोविडेतर रुग्णांची संख्या वाढत आहे. एकाच वेळी अनेक आजारांचे रुग्ण पालिका रुग्णालयात येत असल्याने औषध तुटवडा होण्याची शक्यता असते. मात्र, ती तुटवडा स्थिती तात्पुरत्या स्वरुपाची असते. शुक्रवारी केईएम रुग्णालयात (KEM Hospital) जी स्थिती झाली, तशी पुन्हा होऊ नये यासाठी आता एखाद्या रुग्णालयात महिनाभरात किती औषधे लागतात याचा आढावा घेतला जात आहे. यातून पूर्ण महिनाभर लागणाऱ्या औषध पुरवठ्याची आगाऊ व्यवस्था (advance provision) केली जाणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.