कामगार संघटना, नेते व पालिका आयुक्त यांची बोनसबाबत यशस्वी बैठक

पालिकेच्या तिजोरीवर पडणार २०४ कोटींचा आर्थिक भार

@maharashtracity

मुंबई: राज्यात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेतील ठाकरे व शिंदे गट न्यायालयात व सत्तासंघर्ष करीत रस्त्यावर एकमेकांशी भांडत आहेत. तर दुसरीकडे दसरा तोंडावर आलेला असताना मुंबई महापालिकेतील (BMC) एक लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसचे वेध लागले आहेत. आज पालिका आयुक्त इकबाल चहल व कामगार संघटनांचे कामगार नेते यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये बोनस देण्याबाबत आयुक्तांनी आश्वासन दिले, अशी माहिती पालिकेतील कामगार संघटनांच्या समन्वय समितीतर्फे कामगार नेते बाबा कदम यांनी दिली.

यावेळी पालिकेतील विविध कामगार संघटनांद्वारे गठीत समन्वय समितीचे अ‍ॅड. महाबळ शेट्टी, वामन कवीस्कर, सत्यवान जावकर, अ‍ॅड. प्रकाश देवदास, पा.शी. साळवी, दिवाकर दळवी, संजीवन पवार, के.पी. नाईक, साईनाथ राज्याध्यक्ष, के.के. सिंह यांच्यासह कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गतवर्षीसुद्धा पालिका कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये इतकाच दिवाळी बोनस देण्यात आला होता. पालिकेच्या सुमारे १ लाख २ हजार कर्मचार्‍यांना या २० हजार रुपये बोनसचा लाभ मिळणार आहे. तर बोनस वाटपामुळे पालिकेच्या तिजोरीवर तब्बल २०४ कोटींचा आर्थिक भार पडणार आहे.

वास्तविक, पालिका कामगारांना यंदा मागील वर्षीच्या बोनस (Diwali bonus) रकमेत काहीशी वाढ होण्याची अपेक्षा होती. मात्र पालिका प्रशासनाने गतवर्षीप्रमाणे यंदाही २० हजार रुपये इतकाच बोनस देण्याची तयारी दर्शवली असून तसे आश्वासन आयुक्तांनी कामगार नेत्यांना (labour union leader) दिल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here