युवासेनेच्या मागणीवर पालिका शिक्षण विभागाचे आदेश
@maharashtracity
मुंबई: मुंबईतील सर्व मान्यताप्राप्त अनुदानित, विना अनुदानित आणि बोर्डाच्या शाळांवर मराठी भाषतून विशेषतः देवनागरी लिपीतून नामलक लावणे बंधनकारक असल्याचे आदेश मुंबई महापालिका शिक्षण विभागाने दिले आहेत. तसेच, याबाबत तात्काळ अंमलबजावणी करण्याचे फर्मावले आहे.
मुंबई महापालिका (BMC) शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ व राजू तडवी ( प्र.) यांनी तसे परिपत्रकच मंगळवारी सायंकाळी जारी केले आहे. राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे नेतृत्व करीत असलेल्या युवासेनेच्या (Yuva Sena) सिनेट सदस्यांनी, शिक्षण उप संचालक संदीप सानवे यांना व पालिका शिक्षण विभागाचे प्रमुख अधिकारी राजेश कंकाळ, राजू तडवी ( प्र.) यांना पत्र लिहिले.
युवासेनेतर्फे सिनेट सदस्य राजन कोळंबेकर, प्रवीण मटकर, प्रदीप सावंत, शशिकांत झोरे आदिंनी विद्यापीठ, महाविद्यालये, खासगी व बोर्डाच्या शाळांवर मराठी भाषतून नामफलक लिहिण्याची मागणी केली होती.
त्यानुसार मुंबईसह राज्यातील सर्व मान्यताप्राप्त विद्यापीठ (University), महाविद्यालये (Colleges), कनिष्ठ महाविद्यालये, खासगी अनुदानित व विना अनुदानित शाळा (Schools), बोर्डाच्या शाळांवर मराठी भाषेत देवनागरी (Devnagari) लिपीत आणि ठळक अक्षरात शाळेचे नामफलक लिहिण्यात यावेत, अशी मागणी केली होती.
त्यानुसार, मुंबईतील सर्व खासगी शाळांवरील नामफलकात ‘बृहन्मुंबई महापालिका मान्यताप्राप्त शाळा’ असे ठळक अक्षरात लिहिण्यात यावे, असे आदेश पालिका शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकात दिले आहेत.
त्यावर राज्य शिक्षण विभाग व मुंबई महापालिका शिक्षण विभागाने तात्काळ सकारत्मक निर्णय घेतला व याबाबत एक परिपत्रक काढून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्रे पाठवली आहेत.
दरम्यान, राज्य सरकारने राज्यातील सर्व दुकानांवरील पाट्या, नामफलक हे मराठी भाषेत व ठळक अक्षरात लिहिण्याबाबत आदेश दिले होते. मात्र त्यावर नीटपणे अंमलबजावणी होत नव्हती. युवा सेनेतर्फे मुंबईसह राज्यातील विद्यापीठ,महाविद्यालये, खासगी अनुदानित, विना अनुदानित शाळा, बोर्डाच्या शाळांवरील नामफलकांवर ( ८ × ३ फूट) मराठी भाषेतून शाळांचे नाव दर्शनीय भागात लिहिण्याबाबत मागणी राज्य शिक्षण विभाग व मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडे केली होती.
त्यावर मुंबई महापालिका शिक्षण विभागातर्फे मंगळवारी सायंकाळी एक परिपत्रक तात्काळ जारी करण्यात आले. मुंबईतील अनुदानित ३९४, विनाअनुदानित ६७८ आणि अन्य खासगी बोर्डाच्या २१९ शाळांना हे परिपत्रक पाठविण्यात आले आहे.