पोलिसांकडून प्राप्त कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत नाकारली परवानगी
शिंदे व उद्धव ठाकरे दोन्ही गटाला नाकारली परवानगी
शिंदे गटाचा दसरा मेळावा एम एम आर डी ए ग्राऊंडवर होणार!
@maharashtracity
मुंबई: दसरा मेळावा तोंडावर आलेला असताना मुंबई महापालिकेने कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत दोन्ही गटांना शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यास परवानगी नाकारली आहे.
गणेशोत्सवात शिंदे व उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये दादर परिसरात राडा झाला होता. त्यानंतर पोलीस ठाण्यासमोरही दोन्ही गट समोरासमोर आल्याने तणावात्मक वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे दसरा मेळाव्यालाही (Dasara Melawa) तणाव वाढू शकतो आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, असे कारण मुंबई पोलिसांनी मुंबई महापालिकेला (BMC) कळवले असल्याचे समजते.
नेमके याच गंभीर बाबीचा आधार घेऊन पालिकेच्या जी/ उत्तर विभाग कार्यालयाने शिवसेनेच्या उद्धव व शिंदे गटांना दसरा मेळावा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) घेण्याबाबत परवानगी देण्यास नकार दिला आहे. पालिकेने याबाबत लेखी पत्र दोन्ही गटांना पाठवले आहे. त्यामुळे एक प्रकारे दोन्ही गटांचे परवानगीबाबतचे अर्ज फेटाळण्यात आल्याचे चित्र समोर येत आहे.
त्यामुळे आता दोन्ही गटांना शिवाजी पार्कवरील दसरा (Dusshera) मेळावा घेण्याबाबतच्या आग्रही भूमिकेवर पाणी सोडावे लागणार आहे. तसेच, दुसरे पर्याय शोधावे लागणार आहेत.
एकनाथ शिंदे गटाने व उद्धव ठाकरे गटाने एमएमआरडीएच्या बीकेसी (BKC ground MMRDA) येथील मैदानासाठीही अर्ज केले होते. परंतु त्यातही शिंदे गटाने बाजी मारली आहे. शिंदे गटाला प्रथम प्राधान्य देत एमएमआरडीएने बीकेसीच्या मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली असून त्यांनी पैसेही भरले असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे माजी महापौर मिलिंद वैद्य यांनी दिली होती. तर, उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray group) पालिकेची शिवाजी पार्कबाबतची संशयित भूमिका अगोदरच हेरली व शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली त्यावर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
शिवसेनेने शिवाजी पार्कवर परंपरागत
दसरा मेळावा घेण्यासाठी पालिकेची परवानगी मिळविण्यासाठी २२ ऑगस्ट रोजीच्या पालिकेच्या जी/ उत्तर विभाग कार्यालयाकडे अर्ज सादर केला होता. त्यानंतर शिंदे गटाने ३० ऑगस्ट रोजी दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्यासाठी परवानगी देण्याबाबतचा अर्ज जी/ उत्तर विभाग कार्यालयाला सादर केला होता. नंतर शिवसेनेतर्फे पालिकेला दोन वेळा स्मरण पत्रही पाठविण्यात आली होती. परवा उद्धव ठाकरे गटातर्फ़े मिलिंद वैद्य यांनी स्वतः जी/ उत्तर कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांनी पालिका विधी खात्याकडून अभिप्राय मागविला असून तो आल्यानंतर परवानगीबाबत कळविण्यात येईल, असे जुजबी उत्तर देत उद्धव ठाकरे गटाची बोळवण केली होती.
मिलिंद वैद्य यांनी, पालिकेकडून परवानगी मिळो अथवा न मिळो शिवसेनेचा मेळावा होणार म्हणजे होणारच, मात्र पक्षप्रमुख जेथे सांगतील तेथे हा मेळावा घेण्यात येईल, असे सांगितले होते. तर माजी महापौर व शिवसेना उद्धव गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी, पालिका आयुक्त व सहाय्यक आयुक्त हे शिंदे गट व भाजप प्रणित राज्य सरकारच्या दबावाखाली असल्याने परवानगी देण्याबाबत जाणीवपुर्वक चालढकल करीत असल्याचा आरोप केला होता.
पालिका जी/ उत्तर विभाग कार्यालयाने पोलिसांच्या हवाल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचे कारण देत दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता शिवसेना उद्धव गटाला व शिंदे गटाला(Shinde group) शिवाजी पार्क मैदान पालिकेकडून मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.
दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्धार
शिवसेना पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, बुधवारी नेस्को मैदानावर घेतलेल्या शिवसेना गट प्रमुखांच्या मेळाव्यात यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्यात येईल, असा निर्धार व्यक्त केला होता.
कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता, पोलीस बंदोबस्तात वाढ
मुंबई महापालिकेकडून शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला कदाचित ठरल्याप्रमाणे परवानगी नाकारली जाण्याची पूर्व माहिती पोलीस व पालिकेला होती म्हणून की काय दोन दिवसांपूर्वीपासूनच शिवाजी पार्क परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्याचा निर्धार व्यक्त केल्याने व शिवसैनिकही आक्रमक भूमिकेत असल्याने दसरा मेळाव्याच्या दिवशी शिंदे व उद्धव गटात जोरदार राडा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच, उद्धव गटाच्या शिवसैनिकांनी पोलिसांना व पालिकेला न जुमानता जबरदस्तीने मेळावा घेण्याचा प्रयत्न केल्यास व त्यावेळी पोलिसांनी लाठीमार केल्यास नक्कीच कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता आहे.
वास्तविक, शिवसेनेला शिवाजी पार्क व्यतिरिक्त नेस्को मैदानावरच दसरा मेळावा घेण्याचा दुसरा पर्याय उलब्ध होऊ शकतो. मात्र उद्धव ठाकरे गटाने दुसरा पर्याय न निवडता शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्याबाबतची आग्रही व आक्रमक भूमिका न सोडल्यास शिवाजी पार्क परिसरात दसऱ्याच्या दिवशी राडा होणार अशी भीती व्यक्त केली जात आहे.